दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडीचे इंजिनासह चार डबे नागोठणे येथे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
हा अपघात रोहा- नागोठणे या स्टेशन दरम्यान घडला. सदर घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून १५० ते २०० प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींच्या बचावासाठी नागोठणे येथून रुग्णवाहीका, एस टी बसेस, अग्निशामक दल दाखल झाले असून, मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल जाले आरहेत. दरम्यान, अपघातामुळे कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. तसेच अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. घसरलेले डबे हटविण्याचे काम सुरू असून, त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर रुळावरुन घसरल्यामुळे मांडवी, मंगला, नेत्रावती आणि निजामुद्दीन एक्सप्रेस या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या काही गाड्या एक-दोन तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मध्य आणि कोकण रेल्वेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून गाडीच्या सुधारित वेळेची खात्री करुन प्रवास सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एसटीच्या दहा विशेष बस घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
अपघातग्रस्तांसाठी आणि त्यांच्या नातलगांसाठी हेल्पलाइनः ०२३५२-२२८१७६ आणि ८९७५५५५७७७