अलिबाग : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील वित्त अधिकारी ओंकार अंबपकर याला ठेकेदाराकडून ८१ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून यात आणखी काहीजणांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
एका बांधकाम ठेकेदाराने विद्यापीठातील डिप्लोमा विभागातील सभागृहाचे बांधकाम केले होते. त्याचे ६७ लाख रूपयांचे बिल मंजूर करण्यासाठी वित्त अधिकारी अंबपकर यांनी १ लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. यात तडजोडीअंती लाचेची रक्कम ८१ हजार रूपये निश्चित झाली.
हेही वाचा : “सामना अजून संपलेला नाही, कोण कोणाची विकेट घेतं हे…”; ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा
दरम्यानच्या काळात संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्याकडे तक्रार केली. या विभागाच्या पथकाने पडताळणी करून आज सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ठेकेदाराकडून विद्यापीठातील वित्त विभागाच्या कार्यालयात लाचेची ८१ हजार रूपये इतकी रक्कम स्वीकारताना अंबपकर यांना रंगेहात पकडण्यात आले. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाडावे, सहायक फौजदार विनोद जाधव, सहायक फौजदार अरूण करकरे, हवालदार महेश पाटील, सागर पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला.
© The Indian Express (P) Ltd