अलिबाग – श्रीवर्धन येथील रामदास गोविंद खैरे वयोवृद्ध इसमाच्या हत्येची उकल करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला यश आले आहे. संपत्तीच्या लालसेतून त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी ठाणे आणि चेंबुर येथून अटक करण्यात आली आहे.

रामदास गोविंद खैरे हे एकटेच कुंदन रेसिडेन्सी येथे राहत होते. त्यांचा फोन बंद असून संपर्क होत नसल्याची तक्रार श्रीवर्धन पोलिसांना प्राप्त झाली. त्यामुळे पोलीस निरीक्षक रिकामे यांनी त्यांच्या घरी जाऊन पहाणी केली. यावेळी रामदास गोविंद खैरे यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी घटना स्थळाला भेट दिली. यानंतर या प्रकरणी अज्ञातांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गंभीर स्वरुप लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथकांचे गठन करून तपासाला सुरुवात केली. तांत्रिक पुराव्यांच्या साह्याने दोन संशयित आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर कळवा ठाणे आणि चेंबूर येथून एक महिला आणि एक पुरुष अशा दोघांना अटक करण्यात आली.

हेही वाचा – Eknath Shinde Health Update : “परिस्थिती जटील, पक्षाचा निर्णय…”, शिंदे गटाच्या नेत्यांची प्रतिक्रिया

हेही वाचा – Chhagan Bhujbal : “महायुतीत भाजपा एक नंबर तर अजित पवार दोन नंबरवर…”, सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच छगन भुजबळांचं मोठं विधान

संपत्तीच्या लालसेतून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रामदास खैरे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते गावी एकटेच राहत होते. एकाकी राहत असल्याने त्यांनी मित्राच्या मदतीने एका महिलेशी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र या महिलेनी त्यांच्याकडे मुंबईत घर आणि दागिने घेऊन देण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करू शकत नसल्याने त्यांनी लग्नास नकार दिला. दरम्यान या महिलेनी तिच्या एका परिचयातील महिलेला रामदास खैरे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी जवळीक साधण्यास सांगितले. त्यानुसार या महिलेनी रामदास यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला नंतर काही दिवस त्यांच्या सोबत श्रीवर्धन येथे येऊन राहिली. लग्नाचे आमिष दाखवून दागिने आणि पैसे लुटले आणि पसार झाली. रामदास यांनी पैसे आणि दागिने परत करण्यासाठी मागणी सुरू केल्याने, रामदास यांची हत्या करण्याचा कट रचला. यासाठी तिने तिच्या पतीची मदत घेतली. सुरुवातीला जेवणात किटक नाशक टाकून त्यांना झोपवले. नंतर दोघांनी मिळून रामदास झोपेत असताना त्यांची हत्या केली. यानंतर घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाले. मात्र पोलिसांनी तपास कौशल्याच्या जोरावर दोघांना पकडले. आणि श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे भास्कर जाधव, लिंगप्पा सरगर, आदींनी महत्वाची भूमिका बजावली.