हर्षद कशाळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने सहाशे कोटींच्या आराखडय़ाला मंजुरी दिली असून, पहिल्या दोन टप्प्यांत जवळपास ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र किल्ला संवर्धनाचे काम संथगतीने सुरू आहे. रायगड किल्लय़ाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने सहाशे कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. यात किल्ल्याच्या संवर्धनाबरोबर आसपासच्या परिसराचा विकास केला जाणार आहे.
रायगड किल्लय़ावरील संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम हे भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत केले जाणार आहे. तर गडाखालील परिसरातील कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष पथकामार्फत केली जाणार आहेत. पाचाड ते महाड रस्त्याच्या रुंदीकरणाची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणावर सोपविण्यात आली आहे. या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी रायगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. किल्ला संवर्धनाच्या कामासाठी रायगड प्राधिकरणाने पुरातत्त्व विभागाकडे ११ कोटींचा निधी वर्ग केला आहे. यापैकी ३७ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. पुरातत्त्व विभागाकडून सध्या उत्खननाची कामे सुरू आहेत. रायगडावर साडेतीनशे जुने वाडे आहेत. या वाडय़ांचे उत्खनन पुरातत्त्व विभागाकडून केले जाणार आहे. या वाडय़ापैकी केवळ सात वाडय़ांचे उत्खननाचे काम आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे. तर किल्लय़ाच्या राजसदर आणि मुख्य वास्तूच्या संवर्धनाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. प्राधिकरणाच्या वतीने गडावरील ८४ पैकी २४ तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्ता आणि पाचाड येथे शिवसृष्टी आणि वाहनतळ उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. मात्र प्रत्यक्ष कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. महाड ते पाचाड रस्त्याचे काम कंत्राटदाराच्या निष्क्रियतेमुळे दोन वर्षे सुरूच होऊ शकलेले नाही. आता नवीन कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिजाऊ समाधी स्थळ आणि वाडय़ाच्या दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागामार्फत होणार आहे. मात्र ही कामेही अद्याप सुरू होऊ शकलेली नाहीत, गडसंवर्धनाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. पावसाळ्यातील चार ते पाच महिने गडावर काम करता येत नाही. त्यामुळेही कामाचा वेग मंदावतो आहे.
विकास आराखडय़ात समाविष्ट कामे
किल्लय़ाचा इतिहास जिवंत करून दाखविण्यासाठी शिवसृष्टी तयार करणे. रायगड किल्लय़ावर प्राचीन वास्तूंचे संवर्धन, उत्खननातील प्राचीन इमारतींचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे बांधणे,घनकचरा व्यवस्थापन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा समावेश या आराखडय़ात करण्यात आला आहे.
रायगडावर करण्यात येणारी कामे..
रायगड किल्ल्यावरील चित्त दरवाजा, नाना दरवाजा, खुबलढा बुरूज, महादरवाजा आदींचे संवर्धन व जीर्णोद्धार करणे. तसेच शिवप्रेमींना रायगडावर पोहचण्यासाठी मजबूत पायवाटा निर्माण करणे, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी महत्त्वाच्या सोयी उपलब्ध करून देणे, जलसंवर्धन करणे या बाबींचा समावेश आहे. याशिवाय पाचड येथील राजमाता जिजाऊ समाधी व जिजामाता वाडा यांच्या संवर्धन व जीर्णोद्धाराचे कार्य तथा या ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
गडावरील मुख्य वास्तू आणि त्या सभोवतालच्या परिसराच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाची कामे ही भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत केली जात आहेत. त्यासाठी त्यांना प्राधिकरणाकडून ११ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र यातील ३७ लाख रुपयांची कामे त्यांनी आत्तापर्यंत केली, ही परिस्थिती कायम राहिली तर पुढील २५ वर्षे ही कामे पूर्ण होणार नाहीत. पुरातत्त्व विभागाच्या महासंचालकांच्या ही बाब लक्षात आणून दिली आहे.
– खासदार संभाजी राजे, अध्यक्ष रायगड प्राधिकरण
नोव्हेंबर ते मे या कालावधीत गडावर प्रत्यक्ष कामे करता येतात. पावसाळ्यात ही कामे पूर्ण बंद असतात. त्यामुळे काम करण्यास कालावधी कमी मिळत आहे. या कालावधीत तांत्रिक बाबींची पूर्तता आम्ही करत असतो. ती कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा एकदा कामांना पुन्हा सुरुवात होऊ शकेल.
– वरुण भामरे, पुरातत्त्व अभियंता रायगड किल्ला प्राधिकरण