गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांनी करोना चाचणी करून यावे, अथवा लसीकरण प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे असे आवाहन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले. रायगडात दाखल होण्यासाठी प्रशासनाकडून करोना चाचणीची सक्ती केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्या अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

रायगड जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांना जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही विशेष निर्बंध घातले जाणार नाही. मात्र राज्य सरकारकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर काही निर्देश आलेच तर त्याची तंतोतंत अमंलबजावणी केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येणाऱ्या गणेश भक्तांनी करोना चाचणी करून रायगडात यावे अथवा लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर मुंबई गोवा महामार्गाच्या तातडीने दुरुस्तीचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम काही ठिकाणी सुरुही झाले आहे, हे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी याबाबतचा आढावा तीन दिवसांनी पुन्हा एकदा घेतील असेही त्यांनी यावेळी सांगीतले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देशही दिल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. पोलिसांनी या काळात वाहतूक कोंडी होणार नाही याचे नियोजन करावे. अन्न व औषध प्रशासनाने उत्सवकाळात भेसळयुक्त पदार्थांची विक्री होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केल्या आहेत.

करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व रुग्णालयात पुरेसा औषध साठा आणि करोना चाचणी किट उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण भागात दाखल होणाऱ्या नागरीकांचे गाव निहाय सर्वेक्षण करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणांना दिल्या. गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोव्हीड नियमांचे पालन करावे. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे काटोकोर पालन करावे, सार्वजनिक आरत्यांना मोठी गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी सूचना त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पोलीस अधिक्षक अशोक दुधे उपस्थित होते.

Story img Loader