अलिबाग – मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पालकमंत्रीपदावरून महायुतीत चढाओढ सुरू झाली आहे. रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच हवे अशी मागणी आमदारांनी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या या मागणीला भाजपच्या आमदारांचेही समर्थन असल्याचा दावा सेना आमदारांनी केला आहे. कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद जायला नको यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. यात रायगड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे, आणि शिवसेनेच्या भरत गोगावले यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. दोघांनाही अद्याप खातेवाटप करण्यात आलेल नाही. मात्र त्यापूर्वीच रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले हेच हवेत अशी मागणी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे. या मागणीला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. भाजपच्या आमदारांचाही या मागणीला पाठिंबा असल्याचा दावा शिवसेना आमदारांकडून यावेळी करण्यात आला. अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी शिवसेना आमदारांनी प्रयत्न सुरू केल्याचे यावरून दिसून येत आहे.

हेही वाचा – पुणे : सावत्र वडिलांच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिल्यामुळे शिवसेना आमदार नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी उठाव केला होता. यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरही शिवसेनेच्या आमदारांनी अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देऊ नये यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे उदय सामंत यांना रायगडच्या पालकमंत्रीपदी कायम ठेवण्यात आले होते.

हेही वाचा – शहरबात… असा ‘अंमल’ बरा नव्हे!

विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात कुरबुरी सुरूच होत्या. तटकरे यांच्याकडून शिवसेनेच्या आमदारांना पाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला होता. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रीपद कुठल्याही परिस्थितीत अदिती तटकरे यांच्याकडे जाऊ नये यासाठी शिवसेना आमदारांनी प्रयत्न सुरू केले असल्याचे सध्या दिसून येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad guardian minister issue shivsena bharat gogawale aditi tatkare ssb