लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
अलिबाग- रायगड जिल्ह्यात सूरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री, कुंडलिका, आंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाताळगंगा नदीच्या पातळीत मोठी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केली आहे.
गेल्या २४ तासांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सह्याद्रीच्या घाट रांगामध्ये अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका, सावित्री, आंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली. महाबळेश्वर, पोलादपूर आणि रायगड खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका महाड परिसराला बसला. त्यामुळे महाड शहरातील सुकट गल्ली, नाते खिंड, मच्छीमार्केट सह सखल भागात पुराचे पाणी शिरले.
आणखी वाचा-मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, वाऱ्यांचा वेगही वाढणार
गेली दोन दिवस कुंडलिका नदी सतत इशारा पातळीवर वाहत होती. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास तीने धोका पातळी ओलांडली. त्यामुळे कोलाड, गोवे, रोहा शहरातील सखल भागात पूराचे पाणी शिरले. आंबा नदीने सकाळी सहाच्या सुमारास धोका पातळी ओलांडली. त्यामुळे नागोठणे शहरातील बस स्थानक, मच्छीमार्केट, बाजारपेठ परिसरात पूराचे पाणी शिरले.
लोणावळा, खंडाळा परिसरात सरू असलेल्या पावसाचा खोपोली, खालापूर, आपटा परिसराला फटका बसला. पाताळगंगा नदीने सकाळी आठ वाजता इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे खोपोली शहरातील सखल भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. वाकण पाली मार्गावर पूराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. ताम्हाणी घाटात दरड कोसळल्याने, कोलाड पुणे मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.