लोकसत्ता विषेश प्रतिनिधी
अलिबाग : जिल्हा वार्षिक आराखड्यातील १०० टक्के निधीचा विनियोग करण्यात रायगड जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. दिलेल्या मुदतीन विकास निधीचा विनियोग करण्यात रायगड राज्यात तिसरा ठरला आहे.
सन २०२४-२५ करता रायगड जिल्ह्यासाठी ४३२ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. यापैकी ३१ मार्च अखेर ४३२ कोटी रुपयांचा निधी खर्ची पडला आहे. म्हणजेच जिल्हा विकास योजनेतील शंभर टक्के निधी खर्ची पडला आहे. या निधीचा वापर करून जिल्ह्यात जवळपास पावणे चार हजार विकास कामे मार्गी लावण्यात आली आहे. सलग चौथ्यावर्षी रायगड जिल्ह्याने जिल्हा विकास निधी शंभर टक्के खर्च केला आहे.
अनुसूचित जमाती उपयोजने अंतर्गत जिल्ह्यासाठी २८ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. हा निधी देखील शंभर टक्के खर्च झाला आहे. तर आदिवासी उपयोजने अंतर्गत ४१ कोटी ६० लाखांचा निधी जिल्ह्यासाठी प्राप्त झाला होता. यापैकी ४१ लाख ४८ लाख रुपये खर्च झाला आहे. १२ लाखांचा निधी समर्पित झाला आहे. तर आमदार निधी योजने अंतर्गत जिल्ह्यासाठी ३९ कोटी ९४ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. ज्यापैकी ३९ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे.
योग्य नियोजन आणि सातत्यपुर्ण पाठपुरावा यामुळे हे यश संपादन करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जवळपास १०० कोटीं रुपयांची विकास काम मंजूर करून ती कामे मार्गी लावण्यात जिल्हाधिकारी किशन जावळे आणि नियोजन अधिकारी जे. एम. मेहेत्रे यशस्वी ठरले आहेत..
जिल्हा विकास निधीआंतर्गत सर्व विभागांना दिलेला निधी मार्चअखेर पर्यंत खर्च झालाच पाहिजे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना दिल्या होत्या. यांसदर्भात एकूण १५ आढावा बैठका घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. या निर्देशांचे बुहूतांश विभागांनी पालन केले. त्यामुळे ३१ मार्चला दुपारी १ वाजतांच शंभर टक्के निधी खर्ची पडला. त्यामुळे जिल्हा विकास निधी विनियोगात रायगड यंदा राज्यात तिसरा आणि कोकणात दुसरा ठरला आहे.
सन २०२४-२५ हे वर्ष निवडणूकांचे वर्ष होते. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीचा काळ होता. त्यामुळे जिल्हा विकास निधी आचारसंहितेच्या कात्रीत सापडू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक होते. अन्यथा विकास निधी समर्पित होण्याची धास्ती होती. मात्र प्रशासनाने नेटाने प्रयत्न करून सर्व कामे मार्गी लावली. जिल्हाधिकारी जावळे यांनी कोषागार कार्यालयात जाऊन निधी विनियोगाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्याला प्राप्त झालेला निधी समर्पित होणार नाही यासंदर्भात सर्व विभागांना सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. वेळोवेळी निधी विनियोगाचा आढावा घेतला जात होता. त्यामुळे निवडणूक काळ असूनही शंभर टक्के निधी खर्च करण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आले आहे. -किशन जावळे, जिल्हाधिकारी