पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा हवा या मागणीसाठी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नागपूर इथे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रायगडातील प्रमुख संघटनांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या तपासासाठी स्वतंत्र कायदा असावा आणि तो याच हिवाळी अधिवेशनात मंजूर केला जावा अशी मागणी या वेळी करण्यात आली.
गेल्या काही वर्षांत राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर या प्रकरणामध्ये दोषींवर होणाऱ्या शिक्षेचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे पत्रकारांना काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी स्वतंत्र कायदा अशी मागणी केली जाते आहे. मात्र शासनस्तरावर याची दखल घेतली जात नाही. सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने नागपूर इथे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. समितीच्या या आंदोलनाला रायगड जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ, रायगड प्रेस क्लब आणि अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी एच. के. जावळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पवार, रायगड प्रेस क्लबचे सचिव भारत रांजणकर यांच्यासह अलिबागमधील पत्रकार उपस्थित होते.

Story img Loader