अलिबाग : लग्नाचे अमिष दाखवून कर्जत येथे राहणाऱ्या एका महिलेस ७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक येथे राहणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना ७ डिसेंबर ते ४ फेब्रुवारी या दरम्यान घडली आहे. नाशिक येथे तरुणाने कर्जत भिसेगाव येथे राहणाऱ्या महिलेचा विश्वास संपादन केला. लग्न करण्याचे अमिष दाखवून तीला आपल्या प्रेमात ओढले नंतर अमरावती येथे बिअर शॉपी विकत घ्यायची आहे. त्यासाठी पैशाची गरज आहे, असे सांगून सदर महिलेच्या स्टेट बँक ऑफ इंडीया, बँक ऑफ बडोदा आणि एच.डी.एफ.सी या बँक खात्यातील एकूण सात लाखांची रक्कम फोन पे आणि जी पे अॅपद्वारे त्याचे स्वत: च्या अँक्सीस बँक खात्यात वळते करून घेतले. या शिवाय ९० हजार रुपयांची रक्कम रोख स्वरूपात मागून घेतली. नंतर घेतलेले ७ लाख ९० हजार रुपयांची रक्कम परत करणार नाही असे सांगून फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने कर्जत पोलीस ठाणे गाठले, आणि फसवणूक प्रकरणी तक्रार नोंदवली. महिलेच्या तक्रारी नंतर नाशिक येथील तरूणा विरोधात भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३१८(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कीर्तीकुमार गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.