रायगडमधील महड येथील विषबाधेच्या घटनेत गुरुवारी रात्री आणखी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजय शिंदे (वय ११) आणि गोपीनाथ नकुरे (वय ५५) अशी या मृतांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खालापूर तालुक्यातील महडमधील सुभाष माने यांच्या घरात सोमवारी वास्तुशांती समारंभ होता. त्यानंतर रात्री जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवण झाल्यानंतर अनेकांना उलट्या होऊ लागल्या. हा त्रास वाढल्याने ३० ते ४० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील तीन चिमुकल्यांचा सोमवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कल्याणी शिंगुर्डे (वय ७ वर्षे), ऋषीकेश शिंदे (वय १२ वर्षे) आणि प्रगती शिंदे (वय १३ वर्षे) अशी या मृतांची नावे होती.

विषबाधा प्रकरणात गंभीर प्रकृती असलेल्यांवर नवी मुंबई आणि पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. यातील विजय शाहूराज शिंदे (११) आणि गोपीनाथ नकुरे (५५) या दोघांचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेतील मृतांचा आकडा आता पाचवर पोहोचला आहे.

दरम्यान, मुंबईतील न्यायवैद्यक पथकाने जेवणाचे नमुने, घराच्या मागे असलेली माती आणि किराणा मालाचे नमुने तपासणीसाठी गोळा केले होते. तपासणीचा अहवाल आल्यानंतर विषबाधा नेमकी कशातून झाली हे स्पष्ट होणार आहे.