हवामानातील बदल आणि कीड रोगामुळे कोकणातील आंबा पिकाचे गेल्या वर्षी नुकसान झाले होते. हे नुकसान लक्षात घेऊन आंबा बागायतदारांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याअंतर्गत रायगड जिल्ह्य़ासाठी १३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्याचे तालुका स्तरावर वितरण केले जाणार आहे.
   कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्य़ांत ९९ हजार १७२ हेक्टर आंब्याचे उत्पादनक्षम क्षेत्र आहे. त्यापैकी ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर गेल्या वर्षी फुलकिडय़ांचा प्रादुर्भाव झाला होता. फुलकिडे आणि वातावरणातील बदलामुळे कोकणातील आंबा पिकाचे नुकसान झाले होते. अशा आंबा बागायतदारांना विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन १२-१३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले होते. या प्रस्तावाला राज्य सरकारने गेल्या डिसेंबर महिन्यात प्रशासकीय मान्यता दिली होती. वित्त विभागाच्या मंजुरीनंतर आता कोकणातील चार जिल्ह्य़ांसाठी ७४ कोटींची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. यातील पहिल्या टप्प्यातील ३५ कोटींचा निधी कोकणातील चार जिल्ह्य़ांना यापूर्वीच प्राप्त झाला आहे. आता मार्चअखेर उर्वरित सर्व निधी चारही जिल्ह्य़ांना वितरित करण्यात आला आहे. यानुसार रायगड जिल्ह्य़ासाठी १३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली आहे.
विशेष बाब म्हणून आंबा उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट असणाऱ्या उत्पादनक्षम क्षेत्राच्या ६० टक्के भागासाठी प्रति हेक्टरी १५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य वितरित केले जाणार आहे. तालुका स्तरावर या निधीचे वितरण करण्यात येणार असून बागायतदारांच्या थेट बँकांमधील खात्यात ही रक्कम वितरिीत केली जाणार आहे. सहा वर्षांवरील उत्पादनक्षम तसेच सातबारावर नोंद असणाऱ्या झाडांसाठीच ही मदत मिळणार आहे.

रायगड जिल्ह्य़ातील १४ हजार हेक्टरांवरील २९ हजार आंबा बागायतदारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. तालुका स्तरावर निधीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ४ कोटी ६४ लाख रुपयांच्या निधीपैकी २ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. याचा फायदा जिल्ह्यातील ६७४४ बागायतदारांना झाला आहे. मात्र अद्यापही २३ हजार शेतकऱ्यांना जवळपास १० कोटी ३३ लाख रुपयांचा निधी वितरित करणे बाकी आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी सातबारा उतारा आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील खात्याचा क्रमांक घेऊन संपर्क साधावा, असे आवाहन कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.

Story img Loader