अलिबाग- खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रायगडच्या आरोग्य यंत्रणेवर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करून टाकली आहे. रायगडची आरोग्य यंत्रणा सडलेली असल्याचा उद्वीग्न संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या चार दिवसात म्हसळा आणि श्रीवर्धन मधील दोन रुग्णांचा उपचाराआभावी मृत्यू झाला. श्रीवर्धन येथील एका रुग्णाला हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. त्याला पुढील उपचारासाठी मुंबईत हलवणे गरजेचे होते. मात्र आदिती तटकरे यांनी आमदार फंडातून श्रीवर्धन येथील शासकीय रुग्णालयाला दिलेली अत्याधुनिक कार्डीयाक रुग्णवाहिका गाडीचा पाटा तुटला असल्याने नादूरुस्त होती. वेळेत दुसरी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्याने, त्या रुग्णाचा उपचारा आभावी मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत मोर्बा येथील चौदा वर्षीय मुलाचा उपचाराआभावी मृत्यू झाला. या मुलाला वारंवार ताप येत होता. त्यामुळे त्याला म्हसळा येथील ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलविण्यास सांगितले. मात्र माणगाव उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी त्या चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनामुळे खासदार तटकरे चांगलेच उद्विग्न झाल्याचे सोमवारी पहायला मिळाले. त्यांनी आपला संताप माध्यमांसमोर व्यक्त केला.
जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सडलेली आहे. दोन्ही रुग्णांच्या मृत्यूला आरोग्य यंत्रणाच जबाबदार आहे. त्यामुळे या घटनांची सखोल चौकशी व्हायला हवी, आणि दोषी आरोग्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायला हवेत अशी मागणी त्यांनी रायगडचे जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे केली आहे. कोव्हीड काळानंतर आरोग्य व्यवस्थेची गरज लक्षात घेऊन श्रीवर्धन मधील रुग्णालयाला नामदार आदिती तटकरे यांनी आपल्या आमदार निधीतून सुसज्ज कार्डीयाक रुग्णवाहीका उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णवाहीका सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची आहे. पण त्यांची देखभाल दुरुस्ती होत नसेल तर आरोग्य यंत्रणा बेजबाबदार आहे, पंधरा दिवसापूर्वी या रुग्णवाहिकेचा पाटा तुटला होता. ती तातडीने दुरुस्त करून घेण्याची नैतिक जबाबदारी जिल्हा शल्यचिकीत्सक आणि त्यांच्या यंत्रणेची होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे बेजबाबदार वागणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाने या घटनांची गंभीर दखल घ्यावी सडलेल्या यंत्रणेविरोधआत तातडीने कारवाई झालीच पाहीजे अशी मागणी त्यांनी केली आहे.