राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्याविरोधात केलेल्या जहरी टीकेबाबत रायगड जिल्ह्य़ात गेले दोन ते तीन दिवस चाललेल्या तीव्र संतापाचे पर्यवसान रविवारी राजीनामा मोहिमेत झाले. रविवारी रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उदय जवके यांनी महाडमधील सर्वच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे लिहून घेतले असून लवकरच जिल्ह्य़ातील सर्वच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे समजते. परंतु राजीनामा सत्र मात्र फारच गुप्त पद्धतीने करण्यात येत असल्याचे दिसून येते.
रत्नागिरी व त्यानंतर रायगड जिल्ह्य़ातील खारघर येथील जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री यांनी जिल्ह्य़ाचा कोणताही विकास केला नसून हा विकास केवळ घरच्यांसाठीच केला अशा प्रकारची टीका केल्यानंतर रायगड जिल्ह्य़ात याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. नवी मुंबईमध्ये पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन एका कार्यकर्त्यांचा संताप भास्कर जाधव यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा एक प्रयत्न केला.
त्यानंतर प्रत्येक तालुक्यातून अशा प्रकारचे संताप व्यक्त होत असताना शनिवारी यावर अजित पवार यांनीही अशा प्रकारच्या वैयक्तिक टीका कोणीही कोणावर करू नये असा निर्वाणीचा सल्ला दिला. परंतु ज्या पद्धतीने प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी ही जहरी टीका केली त्याचे परिणाम पाहता पक्षाच्या वतीने या विरोधात पाहिजे तसे उत्तर दिले गेले नाही. ही सत्यता पाहता रायगड जिह्य़ातील सारेच पदाधिकारी अजूनही संभ्रमात आहेत. युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पेण येथे घेतलेल्या तातडीच्या बठकीत आता राजीनामा मोहिमेस सुरुवात केली असून महाडमध्ये साऱ्याच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पत्र लिहून घेतले असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उदय जवके यांच्या हालचालींवरून दिसून आली. परंतु याबाबत फारच गुप्तता पाळण्यात येत होती. आता हे राजीनामे लवकरच शरद पवार यांच्याकडे पाठविण्यात येणार असून प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे आपल्या तोंडाला लगाम घालणार नसतील तर रायगड जिल्हा त्यांचे तोंड बंद करील असा अप्रत्यक्ष इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.