अलिबाग : रात्रभर सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पातळी मोठी वाढ झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजता कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली, आणि आपटा परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अंबा नदीची इशारा पातळी ८ मीटर आहे. तर धोका पातळी ९ मीटर आहे. ती ८.२० मीटर वरून वाहत आहे. कुंडलिका नदीची इशारा पातळी २३ मीटर आहे. तर धोका पातळी २३.९५ मीटर आहे. ती २३.८५ मीटरवरून वाहत आहेत. पाताळगंगा नदीची इशारा पातळी २०.५० मीटर आहे. तर धोका पातळी २१.५२ मीटर आहे. ती सध्या २०.५० मीटरवरून वाहत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने तीनही नद्या कुठल्याही क्षणी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदी किनाऱ्यांवरील गावांना आणि शहरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सखल भागात पूरस्थिती निर्मांण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाडच्या सावित्री नदीच्या पातळीत वाढ झाली असली तरी तीने अद्याप इशारा पातळी ओलांडलेली नाही.
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कोलते गावाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. खालापूर जवळील सावरोली पूलावरून नदीचे पाणी वाहू लागल्याने यापूलावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. खोपोली शहरातील सखल भागात पाणी शिरले आहे.जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे.
हेही वाचा…मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू; १२ आमदारांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू
जिल्ह्यात २४ तासात सरासरी १६२ मिमी पावसाची नोंद
रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अलिबाग, मुरुड,सुधागड, तळा आणि माथेरान येथे २०० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला आहे. तर उर्वरीत सर्व तालुक्यात १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.