अलिबाग – चांगल्या मोबदल्याचे आमिष दाखवून लोकांची पावणे दोन कोटींची फसवणूक करून आखाती देशात पसार झालेल्या रियाझ बंदरकर याला रायगड पोलीसांनी जेरबंद केले आहे. कोची विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने त्याला २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मुरूड तालुक्यातील नांदगाव येथील रियाझ बंदरकर याने तिजाराहा एंटरप्रायझेस नामक एक कंपनी स्थापन केली होती. चांगल्या परताव्याची हमी देऊन अनेक जणांना या कंपनीच्या फसव्या ठेव योजनेत गुंतवणूकीस भाग पाडत होता. सुरवातीला लोकांचा विश्वास बसावा यासाठी त्याने चांगला परतावाही दिला होता. नंतर मात्र तो लोकांनी गुंतवलेले १ कोटी ७८ लाख रुपयांच्या ठेवी घेऊन दुबईत पसार झाला होता.

मुरुड तालुक्यातील अनेकांची फसवणूक केली होती. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात रियाझ विरोधात एमपीआयडी आणि भारतीय न्याय संहीता कायद्यातील विवीध कलमांतर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यापुर्वीच तो देश सोडून पसार झाला होता. त्याचा शोध लागत नसल्याने पोलीसांनी पारपत्र विभागाकडे संपर्क साधून त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. दूबईहून केरळ येथील कोची विमानतळावर दाखल होताच, इमिग्रेशन विभागाने रायगड पोलीसांना रियाझ भारतात दाखल झाल्याची वर्दी दिली. रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला केरळ येथे जाऊन ताब्यात घेतले.

रियाझ याला अटक करून पोलीसांनी अलिबाग येथील विशेष सत्र न्यायाधिश सृष्टी निळकंठ यांच्या न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले. यावेळी जिल्हा सरकारी अभिव्योक्ता म्हणून अँड संतोष पवार यांनी काम पाहीले. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने रियाझ बंदरकर याला २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आणि पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.