नियमित व्यायाम आणि पुरेसा आहार ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते असे म्हणतात. रायगड पोलीस दलातील उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील यांना भेटल्यावर याचा प्रत्यय येतो. वयाच्या ५८ व्या वर्षी ५८ किलोमीटर धावून त्यांनी मंगळवारी आपला वाढदिवस साजरा केला आहे. पोलीस दलातील तरुणांना नियमित व्यायामाचे महत्त्व कळावे म्हणून त्यांनी हा उपक्रम राबविला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची शरीरयष्टी, व्यसनाधीनता, आरोग्य समस्या, कामाच्या ताणामुळे बिघडणारी मानसिकता हा नेहमीच चच्रेचा विषय राहिला आहे. मात्र नियमित व्यायामाने या सर्व समस्यांवर मात करता येते असे कोणी म्हटले तर विश्वास बसणार नाही. मात्र ५८ वर्षांच्या विश्वनाथ पाटलांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. रायगड पोलिसांच्या दादर सागरी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या विश्वनाथ यांनी निवृत्तीच्या दिवशी तब्बल ५८ किलोमीटरचे आंतर धावून सुदृढ शरीर ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे दाखवून दिले आहे.

जिल्हा पोलीस दलाचे माजी क्रीडाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आज वयाच्या ५८ व्या वर्षी ५८ किमी अंतर धावून ३९ वर्षांच्या पोलीस दलातील प्रदीर्घ सेवेची आगळ्यावेगळ्या पद्धतीने सांगता केली. निवृत्ती दिनी ५८ किमी धावून त्यांनी पोलीस दलातील तरुण सहकाऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

विश्वनाथ पाटील यांनी २००६ मध्ये वयाच्या पन्नासाव्या वर्षी सलग ३ हजार २५३ सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम प्रस्थापित केला, तर २००८ मध्ये सलग ६ हजार २०० बठका मारून आपल्या सदृढ शरीरयष्टीची चुणूक दाखवून दिली होती. त्यामुळे निवृत्तीच्या दिवशी ५८ किमी धावण्याचा त्यांनी संकल्प केला होता. तो आज त्यांनी पूर्ण केला.

आकाशातून पडणारा पाऊस. रस्त्यात पडलेले खड्डे. अशा प्रतिकूल वातावरणात ५८ वर्षांचे विश्वनाथ पाटील यांनी गुरुवारी पहाटे ५ वाजता अलिबाग येथील रायगड पोलीस मुख्यालयातून धावण्यास सुरुवात केली. काल्रेिखड-पोयनाड-वडखळ असे टप्पे पार करत ते साई मंदिर (पेण) येथे पोहोचले. तेथून त्यांनी अलिबागकडे येण्याचा परतीचा प्रवास सुरू केला. त्या वेळी रस्त्यावरील वर्दळ वाढली होती. धावण्यात अडथळे येत होते. दुसरीकडे महिन्याभरापूर्वी कुत्रा चावल्याने जखमी झालेला पाय दुखू लागला होता. परंतु पाटील यांनी आपली जिद्द सोडली नाही. चिकाटीच्या जोरावर अलिबाग ते पेण आणि पेण ते अलिबाग हे अंतर पूर्ण करीत त्यांनी लक्ष्य साध्य केले. विशेष म्हणजे विश्वनाथ पाटील यांना आदर्श मानणाऱ्या मुन्ना मास्तर व हवालदार सी. एम. पाटील यांनी सोबत धावून यांना प्रोत्साहन दिले. काल्रेिखड िखड ओलांडली आणि धीर आला. विश्वनाथ पाटलांचा आत्मविशास वाढला. चेहऱ्यावर तेज आले. काहीसा वेग वाढला. सलग ७ तास ४५ मिनिटे धावून पाटील १२.४५ वाजता अलिबाग येथील पोलीस मुख्यालय गाठले.

या वेळी पोलीस दलातील जवानांनी आपल्या या गुरूचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पेण तालुक्यातील वाशी हे विश्वनाथ पाटील यांचे मूळ गाव. पेण खारेपाटातील असल्यामुळे कबड्डी हा त्यांचा आवडता खेळ. कबड्डीपटू विश्वनाथ पाटील १९७७ मध्ये रायगड जिल्हा पोलीस दलात पोलीस खेळाडू म्हणून कॉन्स्टेबल पदावर भारती झाले. १९९३ ते २००६ या कालावधीत त्यांनी रायगड जिल्हा पोलीस दलाचे क्रीडाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.

रायगड पोलीसच्या कबड्डी संघास त्यांनी विशेष प्रशिक्षण दिले आणि या संघाने जिल्हा व राज्य स्तरावर विविध स्पर्धा जिंकून आगळा विक्रम प्रस्थापित केला होता. रायगड पोलीस दलाबरोबरच महसूल विभागातील खेळाडूंनादेखील त्यांनी मदानी खेळ तसेच कबड्डीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी अनेक खेळाडू घडवले. पाटील यांच्या कामगिरीची दखल घेऊन २०१४ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदक, तर २०१५ मध्ये अत्यंत मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

‘‘कुठलाही विक्रम करण्याचा माझा मानस नव्हता. पण पोलीस दलातील तरुणांना चांगला व्यायाम आणि चांगला आहार याचे महत्त्व कळावे म्हणून मी ५८ किलोमीटर धावण्याचा निर्णय घेतला आणि पूर्ण करू शकलो. महिन्याभरापूर्वी कुत्रा चावल्याने माझा पाय दुखावला होता. त्यामुळे मला सहा तासांत हे अंतर पूर्ण करता आले नाही,’’ असे पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.

‘निवृत्तीच्या दिवशी ५८ किलोमीटरचे अंतर धावून विश्वनाथ पाटील यांनी आदर्श घालून दिला आहे. पोलीस दलातील तरुणांनी त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे. त्यांचा हा उपक्रम रायगड पोलिसांच्या कायम लक्षात राहील,’ असे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय, राजेंद्र दंडाळे यांनी सांगितले.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad police inspector vishwanath patil made record in running