रायगड जिल्ह्यात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा बसला असून, सरासरी ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुरुड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, तालुक्यात २४ तासांत तब्बल ३४८ मिलीमीटर पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे काशिद येथे पूल वाहून गेला असून, या दुर्घटनेत एक वाहन चालक वाहून गेला आहे. त्याचबरोबर राजपूरी आणि कळवटे येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तर उसरोली नदीलाही पूर आल्याने सुपेगाव मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात रविवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. किनारपट्टीवरील भागात पावसाचा जोर दिसून येत आहे. मुरुड, श्रीवर्धन तालुक्यात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुरुड येथे ३४८ मिमी, श्रीवर्धन येथे २१० मिमी, माथेरान येथे २१४ मिमी, तर तळा येथे १३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुरुड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अलिबाग मुरुड मार्गावरील जुना पूल रविवारी रात्री वाहून गेला. यात पुलावरील वाहनंही वाहून गेली.

या दुर्घटनेत एकदरा येथील विजय चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर अन्य सहा जणांचे जीव थोडक्यात बचावले. रोहा तालुक्यात केळघर रोडवर कळवटे आदिवासी वाडीजवळ दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. राजपुरी येथे एका झोपडीवर दरड कोसळली. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही. मुरुडमधील उसरोली नदीला पूर आल्याने पुराचे पाणी आसपासच्या परिसरात शिरले. त्यामुळे सुपेगाव मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात पावसाचा जोर आजही कायम आहे. जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.