अलिबाग : मतदार जागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून त्यावर पालकांच्या सह्या घेण्याचे फर्मान रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असतांना विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यास शाळा संस्था चालकांनी विरोध केला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे देशभरात स्विप कार्यक्रमा अंतर्गत मतदार जनजागृती उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय विद्यार्थ्यांकडून मतदान जागृतीसाठी एक पत्र लिहून त्यावर पालकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचे फर्मान शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे. सुजाण नागरीकांना मतदानाचा हक्क दिला आहे. कोणत्याही दबावाला, अभिषाणाला बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावा, नागरीक सुट्टी उपभोगण्यासाठी मतदान करत नाहीत. ते चुकीचे आहे, तसे काही करू नका असे आवाहन या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना करण्यास सांगण्यात आले आहे. या पत्रावर पालकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्या शाळेत जमा करून ठेवण्याचे निर्देशही शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनाला दिले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी याबाबतचे पत्र सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे. सर्व शाळांना हे पत्र पोहोचवून कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा…मनसेचं ‘इंजिन’ यार्डात जाणार? दीपक केसरकर म्हणाले, “महायुतीने राज ठाकरेंना दिलेल्या प्रस्तावानुसार…”
पण सध्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परिक्षा सुरू आहेत. काही ठिकाणी इयत्ता नववीच्या परिक्षाही सुरू झाल्या आहेत. परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मतदान जागृतीसाठी वेठीस धरणे चुकीचे असल्याचे मत शिक्षण संस्था चालकांनी व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांकडून पालकांना उपदेशाचे डोस देणे कितपत योग्य असल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा…“ठिगळ्या-ठिगळ्यांची गोधडी म्हणजे…”, राज ठाकरे – अमित शाह भेटीवरून सुषमा अंधारेंची भाजपावर बोचरी टीका
शाळांमध्ये सध्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांना मतदार जागृतीसाठी वेठीस कितपत योग्य आहे. विद्यार्थ्यांनी पालकांना उपदेश देणे कितपत योग्य आहे. आमची शाळा हा उपक्रम राबविणार नाही. त्यासाठी जी शिक्षा होईल ती आम्ही स्विकारण्यास तयार आहोत. -अमर वार्डे, अध्यक्ष दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्ट