अलिबाग- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा अजित पवार आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली.
सकाळी १० वाजता सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे रेवदंडा येथील अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांच्या समवेत अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे हेदेखील होते. जवळपास अर्धातास त्यांच्यात विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. गेल्या सात आठ महिन्यांत त्यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना सहमती दर्शवली होती. त्यांच्याकडून स्वत:च्या मतदारसंघात कोट्यावधींची कामे मंजूर करून घेतली. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना लोकसभेची स्वप्ने पडू लागल्याने त्यांची भूमिका बदलली असल्याचे दिसून येत आहे. पण लंके यांना पक्षाच्या निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर आधी विधिमंडळ सदस्याचा राजीनामा द्यावा लागेल. अन्यथा त्यांना पक्षांतर्गत बंदी कायदा आंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल, असे तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा – सांगली : आंदोलनकर्त्या कामगारांना मंत्र्यांच्या मध्यस्थीने २०० कोटींची भरपाई
विजय शिवतारे यांच्या मनात काही शंका होत्या त्या आता दूर झाल्या आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढली आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात नक्की सहभागी होतील, असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.