रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा क्षयरोग केंद्राला सध्या विपन्नावस्था आली आहे. ठिकठिकाणी लागलेल्या गळतीमुळे इमारतीला अखेरची घरघर लागली आहे. ही इमारत कोणत्याही क्षणी अखेरचा श्वास घेऊ शकते. त्यामुळे येथे काम करणारे कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत.
रायगड जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात १९८० च्या सुमारास बांधण्यात आलेल्या या इमारतीत जिल्हा क्षयरोग केंद्र आहे. या ठिकाणी जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. क्षय रोग्यांना देण्यात येणाऱ्या औषधांचे भांडार याच इमारतीत आहे. जिल्ह्यातील क्षयरोगी तपासणीसाठी येथे येत असतात. या इमारतीच्या छताचा भाग अनेक ठिकाणी कोसळला आहे. वाढते शहरीकरण आणि घनदाट लोकंसंख्या यामुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत क्षयाचे प्रमाण वाढत चालले आहे. पनवेल आणि उरण हे तालुके क्षयरोगाच्या केंद्रस्थानी आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास तीन हजार जणांना क्षयाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुसज्ज क्षयरोग केंद्र असणे गरजेचे आहे. पण क्षयरोग नियंत्रणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या केंद्रालाच सध्या विपन्नावस्था आली आहे. पावसाळ्यात छतातून पाणी झिरपू नये म्हणून छातवर डांबराचे आच्छादन टाकण्यात आले आहे. तरीदेखील या इमारतीच्या छातून पाणी झिरपते आहे. इमारतीमध्ये औषधांचा साठा आहे. पाणी झिरपत असल्यामुळे औषधे खराब झाली आहेत.
या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सर्वाजनिक बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्येच अजूनही जिल्हा क्षयरोग केंद्र सुरू आहे. इमारत केव्हाही कोसळण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत येथील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत.
‘या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर इमारतीचे नूतनीकरण करायचे की ही इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधावी हे निश्चित होईल. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल. तोपर्यंत या इमारतीमधील जिल्हा क्षयरोग केंद्र दुसऱ्या ठिकाणी भाडय़ाच्या जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहे.’ असे डॉ. बी. एस. नागांवकर, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले.
- जिल्हा क्षयरोग केंद्राला ठिकठिकाणी गळती
- इमारतीचे स्लॅब कोसळण्यास सुरुवात
- सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
- क्षयरोगावरील औषध भिजण्याचा धोका
- कर्मचाऱ्यांवर जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ