अलिबाग : महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत विविध घरकुल योजनेंतर्गत तब्बल २० हजार ४८९ घरकुलांचे भूमिपूजन ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते करण्यात आले. अलिबाग पंचायत समितीमार्फत वाडगांव आदिवासी वाडी येथे पंतप्रधान जनजाती आदिवासी न्यास अभियानमार्फत पी.एम. जन मन योजनेअंतर्गत १९ घरकुलांचे भूमिपूजन सोहळा जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक राहुल पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, वाडगांव ग्रामपंचायत सरपंच सारिका पवार आणि उपसरपंच जयेंद्र भगत उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. तसेच, वाडगांव गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबरोबरच,एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला १०० टक्के कर वसुली पूर्ण करणारी ग्रामपंचायत आहे असे म्हणाले. गावातील शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी निरक्षरांसाठी विशेष वर्ग सुरू करून वाडगांव १०० टक्के साक्षर करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या हस्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलांचे भूमिपूजन करण्याचा हा उपक्रम राज्यात पहिल्यांदाच राबवला जात असल्याचे डॉ. भरत बास्टेवाड यांनी सांगितले. ३१ मार्चपर्यंत वाडगांव आदिवासी वाडीतील १९ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करत, सर्व संबंधित विभागांनी वेळेत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.