अलिबाग :  रायगड जिल्हा परिषद  आणि जिल्हयातील १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पावसाळय़ानंतर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार झाला असून त्याची अधिसूचना आज जारी करण्यात आली. त्यावर येणाऱ्या हरकतींचा विचार करून ही प्रभागरचना अंतिम करण्यात येईल. रायगड जिल्हा परिषदेचे सध्या ५९ प्रभाग असून नवीन रचनेनुसार प्रभागांची संख्या ६६ असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  जिल्हा प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारकडून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता त्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद गटनुसार तसेच पंचायत समिती गणानुसार त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप आराखडय़ावर ८ जूनपर्यंत हरकती सादर करावयाच्या आहेत. त्यानंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. 

नवीन प्रभागरचनेनुसार जिल्हा परिषद मतदारसंघांची संख्या ७ ने वाढणार आहे. पूर्वी ही संख्या ५९ होती ती आता  ६६ करण्यात आली आहे. तर पंचायत समिती मतदारसंघांची संख्या    १४ ने वाढली आहे.  पूर्वीच्या ११८ मतदार संघात वाढ होऊन ती १३२ होणार आहे. आज जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार प्रभाग आणि त्यात समाविष्ट गावांवर राजकीय खलबते सुरू झाली आहेत.  या निवडणुका मार्च महिन्यात होणे अपेक्षित होते. परंतु कोविडमुळे प्रभाग रचना वेळेत निश्चित झाली नाही. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावर या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा विचार न करता निवडणुका तातडीने घ्याव्यात, असे आदेश दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आणि ही अधिसूचना जाहीर झाली आहे.