अलिबाग – अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्या अडीचशे हेक्टरवर या कांद्याची लागवड होत असली तरी, आगामी काळात लागवड क्षेत्र एक हजार हेक्टरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे औषधी गुणधर्म आणि रुचकर चविच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार आहे.
अलिबाग तालुक्यातील वेश्र्वी, वाडगाव, नेहूली, कार्ले, खंडाळे, पवेळे, रुळे, ढोलपाडा, सागाव, तळवली अशा मोजक्याच गावातच पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या कांद्याला रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असल्याने मोठी मागणी असते. मात्र मागणीच्या तुलनेत कांद्यांचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे हा कांदा निर्यातक्षम असूनही तो परदेशात पाठवला जाऊ शकत नाही.
े
दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन दिले आहे. त्यामुळे कांद्याचे ब्रॅण्डिंग होण्यास आता मदत झाली. कांद्याच्या मागणीत चांगलीच वाढ झाली. ही बाब लक्षात घेऊन आता पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले असून, आगामी काळात १ हजार हेक्टरवर या कांद्याची लागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे.
अलिबाग तालुक्यातील अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची शेती केली जाते. साधारण पाच हजार टन उत्पादन दरवर्षी काढले जाते. यात वाढ करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांचा कांदा गट तयार केला आहे. हा गट या हंगामात ३ हेक्टरवर पांढऱ्या कांद्याचे बियाणे तयार करणार आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी सर्व शेतकऱ्यांना प्रती गुंठा साडेचार हजार रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे. या बियाण्यांचा वापर करून अलिबागमधील पांढरा कांदा लागवडीचे क्षेत्र १ हजार हेक्टरपर्यंत वाढवले जाणार आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.