अलिबाग – मुंबई गोवा महामार्गावर दरडीची टांगती तलवार कायम आहे. काही दिवसांपूर्वी महाडच्या नांगलवाडी येथे दरड रस्त्यावर आली होती. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर महामार्गावर दरडीचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. रस्त्यालगतचे डोंगर धोकादायक बनले असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वेळीच याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेली १३ वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गाचे रुंदीकरण करताना रस्त्यालगतचे डोंगर उभे आडवे कापण्यात आले आहेत. त्यामुळे या डोंगराची माती अतिवृष्टीत खचून रस्त्यावर येण्याची भीती आहे. या मातीबरोबर त्यात असणारे मोठे दगड, झाडे देखील कोसळू शकतात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ शकतो. सध्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. रस्ता आणि डोंगर यामध्ये कुठलेच अंतर नाही त्यामुळे कोसळणारी दरड थेट रस्त्यावर येवू शकते. या पूर्वी जुना रस्ता असताना देखील अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यावेळी वाहतूक बंद ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. महामार्गाचे रुंदीकरण करताना याबाबत कुठलीही उपाय योजना केल्याचे दिसून येत नाही.

हेही वाचा – खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरण : उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड

महामार्गावर नागोठणे ते कशेडी घाट या दरम्यान ६ ते ७ ठिकाणे दरड प्रवण आहेत. महाड आणि पोलादपूर तालुक्यात दरड प्रवण क्षेत्र अधिक आहेत. या दोन तालुक्यांमध्ये गेल्या २० वर्षांत अनेकदा दरडी कोसळल्या आहेत. ज्यात दोनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या भागात दरडींचा धोका अधिक आहे.

दासगाव खिंडीत तर दोन्ही बाजूला कातळ फोडून रस्ता रुंद करण्यात आला आहे. तिथंही पावसाळ्यात दरडीचा धोका संभवतो. अशा घटनांना आळा बसावा याकरिता महामार्ग विभागाने काही ठिकाणी डोंगर, खडकाच्या पृष्ठ भागावर शॉटक्रीटचे काम केले आहे. डोंगराच्या उत्खननानंतर दगड सैल होत असतात. पृष्ठभाग देखील खराब होत असतो. खराब पृष्ठभाग गुळगुळीत करून सैल दगडांना व डोंगरांना मजबुती देण्याचे काम शॉटक्रीट करीत असते. तरीदेखील उर्वरित भागात दरडी कोसळत असतात. त्यामुळे मुंबई पुणे दृतगती मार्गाच्या धर्तीवर या परिसरातही व्यापक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा – मुंबई : रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास, १६ हजार रहिवाशांची पात्रतानिश्चिती जुलैपर्यंत

ही आहेत दरड प्रवण ठिकाणे

1) सुकेळी खिंड, 2) टोळ, 3) दासगाव खिंड, 4) केंबूर्ली, 5) नडगाव, 6) चोळई, 7) धामणदिवी