रायगड जिल्हा परीषदेचा सरत्या आर्थिक वर्षांचा अंतिम सुधारीत तसेच पुढील आर्थिक वर्षांचा मुळ अर्थसंकल्प अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी सादर केला. सत्ताधारयांसह विरोधकांनीदेखील या अर्थसंकल्पाचे तोंड भरून कौतुक केले. पप्पू पास हो गया अशी प्रतिक्रिया सदस्यांकडून आली .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठया प्रमाणावर उत्पन्न देणारया पनवेल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती पनवेल महापालिकेत समाविष्ट झाल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील तालुक्यांची ठिकाणे असलेल्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपालिकांमध्ये झाले आहे. त्यामुळे उत्पन्नाचे महत्वाचे स्त्रोत बंद पडले आहेत. याचा एकत्रित परीणाम रायगड जिल्हा परीषदेच्या उत्पन्नावर झाला आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प निराशाजनक असेल अशी अपेक्षा होती परंतु अर्थ सभापती आस्वाद पाटील यांनी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याबरोबरच शासनाकडून निधी आणण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावल्याने यंदाही अनेक विभागांसाठी चांगल्या तरतूदी करता आल्या हे आजचा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर लक्षात येत आहे.

त्यामुळे सत्ताधारयांसह विरोधकांनीही या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. त्याच बरोबर काही सूचनाही केल्या आहेत. माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे सर्व घटकांना आणि सर्व पक्षांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे.

उत्पन्नात घट झालेली असताना हा अर्थसंकल्प रेकॉर्डब्रेक असून भविष्यात याचाही रेकॉर्ड ब्रेक करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर जिल्हा परीषदेच्या मालकीच्या जागा ताब्यात घेवून त्या विकसीत कराव्यात अशी सूचना केली.

विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे यांनीही अर्थसंकल्पाचे स्वागत करताना विरोधी पक्षासाठी केलेली तरतूद वाढवावी अशी विनंती केली. बांधकाममध्ये विरोधी पक्षांना ५५ लाख दिले आहेत ते १ कोटी करावेत तर पाणीपुरवठा साठी ३० लाखांची तरतूद ६० लाखांपर्यंत वाढवावी अशी मागणी करतानाच विरोधकांची तरतूद २ कोटीपर्यंत न्यावी असे सुचवले. गंभीर स्वरूपांच्या आजारांसाठी,गांडुळखत निर्मितीची तरतूद वाढवून सुपारीवरील कीडजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोरचूद पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली.

शेकापचे सदस्य सुरेश खैरे यांनी जेव्हा आम्ही जिल्हा परीषदेत प्रवेश केला तेव्हा आमच्या आणि समाजाच्या मोठया अपेक्षा होत्या. परंतु तिजोरीत खडखडाट असल्याचे आमच्या लक्षात आले. परंतु आता आस्वाद पाटील यांनी दुरदृष्टी ठेवून अर्थसंकल्प सादर केला आहे. ते करताना ताळमेळ साधण्यात ते यशस्वी झाले आहेत. महत्वाच्या खात्यांना चांगली तरतूद केली असून त्यामुळे जुने दायित्व निघून जाईल त्यामुळे भविष्यात आम्हाला चांगला निधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाजपाचे प्रतोद अमित जाधव यांनीही मागील अर्थसंकल्पाप्रमाणे शालेय क्रीडा स्पर्धासाठी तरतूद असावी ज्यायोगे जिल्ह्यात चांगले खेळाडू घडण्यास मदत होईल तसेच महसूल वाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत अशी सूचना करत भाजपातर्फे या अर्थसंकल्पाचे स्वागत केले . माजी अध्यक्ष अ‍ॅड. निलीमा पाटील यांनी अर्थ संकल्पाबाबत समाधान व्यकत करतानाच पेण येथे डायलेसीस युनिट सुरू करण्याच्या निर्णयाबददल रायगड जिल्हा परीषदेचे आभार मानले

महादेव दिवेकर,चित्रा पाटील,गीता जाधव,अनुसया पादीर यांनीही अर्थसंकल्पाचे स्वागत करताना काही महत्वपूर्ण सूचना मांडल्या. नव्याने रुजू झालेले रायगड जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांचे यावेळी अध्यक्षा आदिती तटकरे यांनी स्वागत केले . सुरूवातीला अभिनंदन व दुखवट्याचे ठराव मांडून त्यांना मंजुरी देण्यात आली.