अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेतील अपहार प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. पाणी पुरवठा विभागापाठोपाठ आता एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजनेतही ४ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी अपहार प्रकरणाचा मुख्य सुत्रधार नाना कोरडे यांच्या समवेत अन्य दोन कर्मचाऱ्यांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याने कोटयवधी रूपयांची रक्‍कम परस्‍पर हडप केल्‍याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. अपहार करणारा कर्मचारी हा पूर्वी महिला व बाल विकास विभागात कार्यरत होता. त्यामुळे तो कार्यरत असणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजना विभागातील मागील चार वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात आली. यातही नाना कोरडे या वेतन देयक तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांने ४ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब खातेनिहाय चौकशीत समोर आली आहे. बनावट वेतन फरकाची देयके बनवून त्यावर बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या मारून, ही रक्कम स्वताःच्या आणि इतर अशासकीय इसमांच्या खात्यात जमा करून अपहार केल्याची बाब समोर आली आहे.

या नंतर या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी तीन कर्मचाऱ्यांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाना कोरडे, जेतिराम वरुडे, महेश मांडवकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक किशोर साळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान अपहार प्रकरण अंगलट येण्याची जाणिव होताच नाना कोरडे यांनी २ कोटी २३ लाख रुपयांची अपहार केलेली रक्कम एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या खात्यात जमा केली असल्याचे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

नाना एकनाथ कोरडे असं त्‍याचं नाव आहे. पगार बीले तयार करताना कर्मचारयांचे नसलेले कपात किंवा वेतन फरक दाखवून या रकमा तो आपल्‍या खात्‍यावर वळवत असे. अन्‍य विभागात कार्यरत असताना कोरडे याने असे उपदव्‍याप केल्‍याची बाब समोर आली असून अपहाराचा आकडा 4 ते 5 कोटींवर जाण्‍याची शक्‍यता आहे. दरम्‍यान या प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी पाच सदस्‍यीय चौकशी समिती गठित करण्‍यात आली आहे.

पाणी पुरवठा विभाग अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

दरम्यान नाना कोरडे यांच्यावर पाणी पुरवठा विभागातील १ कोटी २३ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप अभियंता राहूल देवांग यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. कोरडे यांनी ७ कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन फरकाची रक्कम दाखवून त्याची खोटी देयके तयार करून ही रक्कम स्वतःच्या आणि पत्नीच्या खात्यावर वळती केली होती. या प्रकरणीही कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे वेतन फरकाच्या देयकांच्या नावाखाली कर्मचाऱ्यांने जिल्हा परिषदेला साडे पाच कोंटीची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.