रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ३० हजार चौरस फुटांच्या इमारतीसाठी राज्यसरकारकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. शिवतीर्थ या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम १९७८ ते १९८२ या कालावधीत करण्यात आले होते. या इमारतीच्या बांधकामाला आता ३८ वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यामुळे इमारत जीर्ण बनली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इमारतीच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चातही वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील स्थापत्य अभियंत्यामार्फत इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. यात ही इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचा निष्कर्ष निघाला. त्यामुळे इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात यावी अशी सूचनाही करण्यात आली. त्यामुळे या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीवर अथवा नुतनीकरणावर खर्च करू नये, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यामुळे नविन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.

दोन लेव्हल पार्किंगसह ५ मजल्यांची सुसज्ज इमारत बांधणार

अलिबाग येथील पोस्ट ऑफीस कार्यालयासमोरील जागेत जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे. दोन लेव्हल पार्किंगसह ५ मजल्यांची सुसज्ज इमारत या ठिकाणी बांधली जाणार आहे. यात ३० हजार चौरस फुटाची नवीन सुसज्ज इमारत उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी या इमारतीसाठी एकूण १५ कोटी रुपायांचा निधी आवश्यक आहे. इमारतीचे बांधकाम २ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

नवीन इमारतीत ७५ टक्के कार्यालये सामावून घेणार

जिल्हा परिषदेची सध्याची प्रशासकीय इमारत ही ४० हजार चौरस फुटाची आहे. त्यामुळे नवीन इमारतीत ७५ टक्के कार्यालये या नवीन इमारतीत सामावून घेतली जाऊ शकणार आहे. उर्वरीत २५ टक्के कार्यालयांची पर्यायी जागेत व्यवस्था करावी लागणार आहे. नंतर जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करता येणार आहे.

हेही वाचा : अमेरिकेत १२ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; १ मृत्यू, ९९ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

जुनी इमारत धोकादायक झाल्याने नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. यास मान्यता मिळाली तर लवकरच कामाला सुरुवात करता येईल. २ वर्षात नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हावे यासाठी आमचे प्रयत्न राहतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता के वाय बारदस्कर यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad zp building become dangerous structural audit confirm pbs