रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प पूर्णपणे वास्तवदर्शी असून, आतापर्यंत केवळ घोषणाबाजी झाल्यामुळेच कोणतेही नवीन प्रकल्प हाती घेता आले नसल्याचे मिरज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. तर रेल्वेमंत्री प्रभू यांनी पश्चिम महाराष्ट्राची फसवणूक केली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली.
यापूर्वी काँग्रेसच्या रेल्वेमंत्र्यांनी केवळ घोषणाबाजीवर भर दिला. मात्र प्रत्यक्षात कोणतेही विकासात्मक काम केले नाही. सुरेश प्रभू यांनी सवंग लोकप्रियता टाळत वास्तवदर्शी अर्थसंकल्प सादर करून लोकांच्या प्रलंबित प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत देशपांडे यांनी व्यक्त केले. रेल्वेमंत्र्यांनी आता विभागवार रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवत असताना त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रवासी संघटना यांच्यातील अपेक्षांचा मागोवा घेत प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, की कोल्हापूर पुणे लोहमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण, पंढरपूरसाठी दिवसा पॅसेंजर गाडी, दुष्काळी खानापूर, आटपाडी तालुक्यासाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करणे, कोकण मार्गावरून कोल्हापूर जोडणे आदी प्रश्न प्रलंबित असताना याबाबत कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. रेल्वेमंत्र्यांनी सामान्य जनतेच्या पदरात काहीही दिलेले नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार यांनी रेल्वेचे अंदाजपत्रक विकासाला चालना देणारे असल्याचे सांगत रेल्वे प्रवाशांवर कोणताही बोजा न टाकता विकासाला प्राधान्य देणारे असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा