देशातील महत्त्वाकांक्षी ‘क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग’ (सीसीटीएनएस) यंत्रणा रेल्वे पोलिसांच्या नागपूर विभागात अद्यापही सुरू झालेली नसून ती केव्हा सुरू होईल, हे कुठलाच अधिकारी सांगू शकत नसल्याची सध्याची स्थिती आहे. रेल्वेच्या नागपूर विभागात नांदेड, इगतपुरी, नंदुरबारपासून महाराष्ट्राच्या पूर्व सीमेपर्यंतचा भाग समाविष्ट होतो.
संपर्क यंत्रणा उपलब्ध असली तरी गुन्हेविषयक आकडेवारीसह इतर माहिती केव्हाही आणि कुठेही उपलब्ध होण्यासाठी यंत्रणा नव्हती. ‘क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग’ (सीसीटीएनएस) यंत्रणा त्यादृष्टीने अत्यंतउपयोगी पडणार आहे. देशाच्या कुठल्याही भागात संगणकाची कळ दाबली की, देशाच्या कुठल्याही भागातील दाखल गुन्हे, आरोपी, तपासाची प्रगती आदी माहिती उपलब्ध होऊ शकेल. देशभरातील सर्व पोलीस ठाणे, अधिकारी, तसेच त्यांची कार्यालयातील संगणक एकमेकांशी या यंत्रणेद्वारे जोडले जातील. एप्रिल २०१३ मध्ये यंत्रणा सुरू करण्याचे ठरले होते, मात्र ती अद्यापही सुरू झालेली नाही. रेल्वे पोलिसांच्या नागपूर विभागात (साडेचार हजार किलोमीटर) १६ पोलीस ठाणे आहेत. याशिवाय, उपशाखा आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येकी ५ संगणक, तर उपशाखांमध्ये (२३ साईट्समध्ये) प्रत्येकी १ संगणक बसविले जाणार आहेत. असे एकूण १०३ संगणक या यंत्रणेला जोडले जाणार आहेत. रेल्वे पोलिसांसाठी ही यंत्रणा उपयुक्त अशीच आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर तो त्याच्या मूळ गावी संगणकावर या तक्रारीचे पुढे काय झाले, याची माहिती घेऊ शकतो. तक्रार कुठल्याही भाषेत असली तरी ती तक्रार व तपासातील प्रगती, इतर माहिती कुठल्याही भाषेत पाहू शकण्याची सोय या संगणक प्रणालीत आहे.
नागपूर विभागात अद्यापही हे काम सुरूच आहे. महाराष्ट्रामध्ये ‘सीआयडी’कडे या कामाची जबाबदारी असून विप्रो कंपनीला यंत्रणेचे कंत्राट देण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांचे साडेचारशे कर्मचारी प्रशिक्षण घेऊन आले. संगणक, जनित्र, ब्रॉड बँड आदी उपकरणे रेल्वे पोलिसांच्या अधीक्षक कार्यालयात धूळ खात पडली आहेत. यंत्रणेचे काम सुरू असले तरी ते अत्यंत संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी वायरिंग सुरू असल्याचे दिसले. काम लवकरात लवकर पूर्ण होऊन यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी, असे कुणालाच वाटत नसल्याचे कामाच्या गतीवरून स्पष्ट होते. गोंदिया, नागपूर, इतवारी रेल्वे पोलीस ठाण्यात हे काम झाले असल्याचे सांगण्यात आले. कामाची ही गती पाहता, ही यंत्रणा सुरू होण्यासाठी आणखी एक वर्ष लागेल.
चौकट
‘प्रकल्प तातडीने पूर्ण करणार’
रेल्वेच्या नागपूर विभागात हे काम सुरू असून ते तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने लक्ष असल्याचे रेल्वेचे पोलीस आयुक्त प्रभातकुमार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. आतापर्यंतचा गुन्हेविषयक रेकॉर्ड संगणकात भरणे सुरू आहे. हे काम मोठे असल्याने वेळ लागत आहे. याबरोबरच तांत्रिक कामेही सुरू आहेत. रेल्वेच्या नागपूर विभागात बसविण्यात येणारे सर्व संगणक एकमेकांशी लवकरच जोडले जातील. प्रत्यक्ष यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आणखी काही उपकरणांची गरज असून ते विप्रो कंपनी उपलब्ध करून देईल. हा प्रकल्प अत्यंत उपयोगी असून हे कामही मोठेच आहे. त्यामुळे हा वेळ लागतो आहे. असे असले तरी विलंब होणार नाही, याकडे सातत्याने लक्ष असल्याचे प्रभातकुमार यांनी स्पष्ट केले.
रेल्वेच्या ‘सीसीटीएनएस’यंत्रणेला कूर्मगतीचा शाप
देशातील महत्त्वाकांक्षी ‘क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग’ (सीसीटीएनएस) यंत्रणा रेल्वे पोलिसांच्या नागपूर विभागात अद्यापही सुरू
First published on: 21-10-2013 at 02:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway cctns slow down