रेल्वे पोलिसांच्या नागपूर विभागाचे विभाजन करण्यात येणार असून, भूसावळ व औरंगाबाद या नवीन दोन विभागांची निर्मिती करण्यात येणार आहे. या निर्णयाला लवकरच सरकारकडून मंजुरी मिळेल, अशी माहिती रेल्वेच्या नागपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक शशिकांत माने यांनी दिली.
माने यांनी शनिवारी श्रीरामपूर (बेलापूर) रेल्वेस्थानकाला भेट दिली. या वेळी आयोजित केलेल्या बैठकीत माने बोलत होते.
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वेस्थानक आहे. येथील गुन्हेगारी रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांची स्वतंत्र चौकी सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल. श्रीरामपूर स्थानकावरील गुन्हेगारीत वाढ झाली असून, ते संवेदनशील बनले आहे. त्यामुळे येथील चौकीवर एक उपनिरीक्षक व तीन पोलीस कर्मचारी यांची आणखी नव्याने नेमणूक केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या मुंबई व पुणे हे दोन विभाग वगळता संपूर्ण राज्यातील रेल्वे पोलिसांचे काम भुसावळ विभाग बघतो. त्यांच्यावर कायदा सुव्यवस्था राखताना अडचणी येतात. त्यामुळे आता मराठवाडय़ासाठी औरंगाबाद येथे व इगतपुरी ते धुळे या मार्गासाठी भुसावळ हे दोन स्वतंत्र विभाग करण्यात येतील. नागपूर व अकोले या मार्गासाठी नागपूर हा विभाग राहील असे त्यांनी सांगितले.
यांनी श्रीरामपूर येथील रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलीस चौकीवर अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी नगराध्यक्षा ससाणे यांनी केली. या वेळी दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील रेल्वेगाडय़ांत होणाऱ्या चोऱ्या, मारहाणीच्या घटना, तृतीयपंथीयांकडून प्रवाशांना दिला जाणारा त्रास यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या. या गुन्हेगारीचा बिमोड केला जाईल असे माने यांनी सांगितले.