मागास विदर्भ आणि मराठवाडय़ात औद्योगिकीकरणाला चालना द्यायची असेल, तर रेल्वेचे जाळे उभारणे आवश्यक आहे. एक काम २५ वर्षे रखडवून ठेवून थांबता येणार नाही. त्यामुळे येत्या काळात रेल्वेचे जाळे निर्माण करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार असून, त्यासाठी विशेष हेतूने सरकारी संस्थाही कार्यान्वित केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. येथील उद्योजक राम भोगले यांच्या षष्टय़ब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. विदेशात वेगवेगळ्या औद्योगिक संस्थांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे. विशेषत: औरंगाबाद, शेंद्रा-बिडकीन या औद्योगिक पट्टय़ात ती अधिक व्हावी, या साठी सरकारचे प्रयत्न आहेत. या कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असेही ते म्हणाले. भोगले यांनी मराठवाडय़ाचे मागासलेपण दूर करण्यासाठी ऑटो क्लस्टरच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांबद्दल सांगत त्यांच्यासारख्या व्यक्तींना मोठी जबाबदारी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या भागातली माणसे सोन्यासारखी आहेत, मात्र, त्यांच्या पाठीमागे सोन्यासारखेच सरकार असावे लागते. पुढचा काळ मराठवाडा आणि विदर्भाचा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
औरंगाबाद येथे आयआयएम ही संस्था मिळावी, या साठी बरेच प्रयत्न झाले. मात्र, ती संस्था नागपूरला नेण्यात आली. यावरून कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात टोलेबाजीही झाली. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठवाडय़ासाठी काय दिले, असा प्रश्न विचारला असता, स्कूल ऑफ आर्किटेक्चरल ऑफ डिझाईन ही संस्था या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अजून जागा मिळाली नसल्याने ती संस्था मात्र या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होऊ शकणार नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
तत्पूर्वी सरस्वती भुवन प्रशालेच्या शताब्दी पर्व सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस दलाविषयीचा मॅकेन्झीचा अहवाल हा सरकारी नाही. मात्र, त्याचा अभ्यास करू. पोलिसांना अधिक सोयीसवलती उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Story img Loader