नगर शहर व परिसरात बुधवारीही सलग पाचव्या दिवशी दमदार पाऊस झाला. दुपारनंतर सुरू झालेला पाऊस थोडीफार विश्रांती घेत रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. या सततच्या पावसाने शहरातील रस्त्यांची दैना झाली असून ठिकठिकाणी पाण्याची तळी साचत आहेत.
परतीच्या मोसमी पावसाने गेल्या पाच दिवसांपासून शहर व परिसरासह जिल्हय़ात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. बुधवारी शहर व परिसरात सकाळपासून पावसाळी वातावरण होते तरी मधूनच कडक ऊनही पडत होते. त्यामुळे हवेतील उष्णता चांगलीच वाढली होती. दुपारी अडीचच्या सुमारास शहरात पावसाला सुरुवात झाली. या वेळी सुमारे तासभर मध्यम सरी कोसळल्या. त्यानंतरही भुरभुर सुरूच होती. थोडा वेळ विश्रांती घेऊन सायंकाळनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. या वेळी अधूनमधून मोठय़ा सरी कोसळल्या, मात्र रात्री उशिरापर्यंत भुरभुर सुरूच होती.
या सततच्या पावसाने शहरातील रस्त्यांची पुरती दैना झाली आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सखल भागात पाणी साचतेच, मात्र बहुसंख्य रस्त्यांवर पावसाने मोठे खड्डे पडले असून, त्यातही पाण्याची डबकी तयार झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्हय़ातच झालेल्या पावसाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. हे आकडे मिलिमीटरमध्ये आहेत. अकोले-३२, संगमनेर-२४, कोपरगाव- ४०, नेवासे-२, नगर-३, शेवगाव-१, पाथर्डी-९, पारनेर-२, जामखेड-३१. अन्य तालुक्यात पाऊस झाला नाही.