रायगड जिल्ह्य़ात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी ६५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पनवेल, उरण आणि तळा तालुक्यांना पावसाने झोडपले. महाड तालुक्यात पाचाड धनगरवाडी इथे दरड कोसळली, सहा गावांचा संपर्क तुटला.     गेल्या चोवीस तासांत अलिबागमध्ये ४० मिमी, पेणमध्ये ६२ मिमी, मुरुडमध्ये ३४ मिमी, पनवेलमध्ये ११२ मिमी, उरणमध्ये १०३ मिमी, कर्जतमध्ये ५५ मिमी, खालापूरमध्ये ४७ मिमी, माणगावमध्ये ६७ मिमी, रोहामध्ये ८० मिमी, सुधागड पाली इथे १९ मिमी, तळा इथे ९५ मिमी, म्हसळा इथे ६२.६ मिमी, श्रीवर्धन इथे ५० मिमी, माथेरान इथे ९० मिमी पावसाची नोंद झाली आहे.       मुसळधार पावसाने महाड तालुक्यातील पाचाड ते सावरट मार्गावर पाचाड  धनगरवाडीजवळ दरड कोसळल्याने कोनाडे, सांदोशी गावांसह सहा गावांचा संपर्क तुटला आहे. दरड कोसळल्याने या गावातील एसटी सेवाही खंडित झाली आहे. त्यामुळे स्थानिकांना आठ ते १० किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पाचाड धनगरवाडीला दरड कोसळल्याची माहिती जिल्हा प्रशासनालाच महाड तहसील कार्यालयाने कळवली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपत्तीच्या बाबतीत प्रशासन किती सजग आहे हे समोर आले आहे.    
 दरम्यान येत्या चोवीस तासांत उत्तर कोकणातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. समुद्रकिनाऱ्यावर ताशी ४५ ते ६० किमी प्रतितासाच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा