लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : जिल्ह्यात सध्या सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. महाबळेश्वर पाचगणीसह साताऱ्यात मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक पाऊस झाला आहे. माण खटाव या दुष्काळी तालुक्यातही मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
जिल्ह्यात मागीलवर्षी पाऊस कमी होता. पश्चिम भागातील प्रमुख आणि मोठे पाणी प्रकल्पही भरले नव्हते. कोयनेसारख्या १०५ टीएमसीच्या धरणातही जेमतेम पाणीसाठा होऊन ९५ टक्क्यांपर्यंतच धरण भरले होते. इतर धरणेही पूर्ण नव्हती. परंतु, यावर्षी जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा झाली आहे. मागील वर्षी महाबळेश्वरलाही आज ९१.०६ मिमी पाऊस झाला. मागील वर्षीपेक्षा ८८२ मिलिमीटर पाऊस अधिक झाला. आतापर्यंत ६ हजार ४४६ मिलिमीटर (२५३.७८० इंच) पाऊस झालेला आहे. मागील वर्षी (५७८०.३०मिमी) (२२७.५७१ इंच) पाऊस झाला होता.
आणखी वाचा-विठ्ठलाच्या पूजेसाठी १ पासून ‘ऑनलाईन’ नोंदणीची सोय; पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित
जिल्ह्याच्या पूर्व भागात चांगलाच पाऊस होत आहे. माण खटाव या दुष्काळी तालुक्यातही मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज दुपारी धो धो पावसाने मायणीकरांना (ता. खटाव) अक्षरशः झोडपून काढले. येथील नैसर्गिक ओढ्यां – नाल्यांवरील अनधिकृत बांधकामे व मनमानी अतिक्रमणामुळे पुराचे पाणी नागरी वस्त्या व दुकानांमध्ये घुसून लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओढ्या नाल्यालगतच्या नागरी वस्त्यांमध्ये रहिवाशी धास्तावले आहेत.
सलग चौथ्या दिवशी मायणीला पावसाने झोडपले. आज दुपारी सुमारे दीड ते चार वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पावसाचा सर्वाधिक फटका ओढ्यालगत असलेल्या नागरी वस्तीला बसला. अनेकांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. दुकानांमध्येही पुराचे पाणी घुसून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच ओढ्यालगतच्या शेतामध्येही पाणी घुसून वेगाने वाहून गेल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे. या पावसाने उरमोडी, तारळी, कण्हेर, धोम, बलकवडी व कास तलाव आणि छोटे मोठे तलाव भरले आहेत.