रविवारी सायंकाळ ते सोमवारी सकाळपर्यंत जिल्हाभर झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. डािळब, द्राक्ष, आंबे, चिंच या पिकांना चांगलाच फटका बसला.
गतवर्षी मार्च महिन्यातच गारपिटीच्या तडाख्याने शेतकरी मोडून पडला होता. खरिपात पावसाने ताण दिला व रब्बीच्या पेरणीच्या वेळी पाऊस गायब झाला. पावसाने पुरते जेरीस आणल्यामुळे शेतकरी आधीच हैराण झाला होता. जिल्हय़ात रब्बीच्या केवळ २५ टक्केच पेरण्या झाल्या. हरभरा, गहू, ज्वारी ही पिके काढणीच्या टप्प्यात आहेत. अशा वेळी अचानक आलेल्या पावसाने शेतकरी पुरता बेजार झाला. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. गावोगावी रानावर काढून टाकलेला हरभरा गोळा करण्यात शेतकरी व्यस्त होते. गोळा केलेला हरभरा झाकण्यासाठी ताडपत्र्या मिळवण्यासाठीची ओढाताणही सुरू होती. संध्याकाळी दमदार पाऊस झाला व पिकांचे मोठे नुकसान झाले.
गहू, हरभरा याबरोबरच काढणीला आलेली रब्बी ज्वारीही काळी पडण्याचा धोका निर्माण झाला. आंब्याला मोठय़ा प्रमाणावर या वर्षी मोहोर होता तो या पावसाने बऱ्याच अंशी गळून पडला आहे. गतवर्षी गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या बागा नव्याने उभ्या करण्याचा प्रयत्न द्राक्ष उत्पादकांनी केला होता. या वर्षी पुन्हा पावसाने द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट ओढवले. सोमवारी सकाळी आठपर्यंत जिल्हय़ात सरासरी १० मिमी पाऊस झाला. कृषी विभागाचे सर्व कर्मचारी व अधिकारी जिल्हय़ातील नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी गावोगावी पाहणी करत असून संध्याकाळपर्यंत ही माहिती संकलित होईल व नुकसानीचा अंदाज लक्षात घेऊन शासनाच्या आदेशानुसार उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांनी सांगितले.
उस्मानाबादेत सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा
वार्ताहर, उस्मानाबाद
दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या जिल्ह्यास सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. मराठवाडय़ातील रब्बी ज्वारीचे कोठार असलेल्या परंडा, तसेच वाशी, भूम, लोहारा व उस्मानाबाद तालुक्यांत अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावून रब्बी हंगामातील गहू, ज्वारीचे पीक जमीनदोस्त केले.
वाशी तालुक्यात सर्वाधिक २६ मिमी, तर जिल्ह्यात सरासरीच्या एकूण १४.२ मिमी पावसाची नोंद झाली. सलग दोन दिवसांत झालेल्या पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला. नळदुर्ग व तुळजापूर तालुक्यांना अवकाळी पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी तडाखा बसला. या पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा पिकांसह द्राक्ष, आंबा, पपई व डाळिंबबागांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पाऊस, त्यानंतर वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षांना मोठय़ा प्रमाणात तडे गेले. दुष्काळ, तसेच नापिकीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा या वर्षी अवकाळीचा तडाखा बसला. जिल्हाभर गहू, ज्वारी, करडई पिकांची काढणी सुरू आहे. काही शेतकऱ्यांची पिके अजूनही शेतात उभी आहेत. या सर्व पिकांची पावसामुळे अक्षरश: माती झाली. ज्वारी, गहू तसेच हरभऱ्याचे पीक आज जमीनदोस्त झाले.
तुळजापूर तालुक्यात द्राक्ष, आंबा, पपई व डािळबबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. द्राक्षांच्या बागेत द्राक्षांचा सडा पडला. काढून ठेवलेली ज्वारी, हरभरा व करडई ही पिके मळणीपूर्वीच भिजून गेल्याने कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. काढणीला आलेला गहू पावसामुळे आडवा झाला.
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
सलग दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावून पिकांचे मोठे नुकसान केले. कृषी विभागाकडून अजून नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू झाली नाही. पिकांचे पंचनामे करून आíथक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश
वार्ताहर, हिंगोली
जिल्ह्यात सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे फळबागेसह रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी आíथक अडचणीत सापडला. बुधवारी (दि. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणीत येणार आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करून प्राथमिक नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दिल्या आहेत. दरम्यान, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री किती मदत जाहीर करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप पीक गेले. सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी प्राप्त १३२ कोटी ९९ लाखांचे पॅकेज जाहीर केले. दोन टप्प्यांत ११० कोटी ९३ लाख निधी प्राप्त झाला. पकी ६२८ गावांतील १ लाख ६२ हजार ३७४ शेतकऱ्यांना ८२ कोटी ८३ लाख निधी वाटप झाला. एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. कापूस खरेदीचे केंद्र मर्जीप्रमाणे चालू-बंद ठेवले जाते. गतवर्षी जिल्ह्यात १ लाख ८३ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. कापसाला ५ ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. या वर्षी २७ फेब्रुवारीपर्यंत १ लाख ७० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. त्यातच जिल्ह्यात शनिवारी व रविवारी जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने गहू, हरबरा, रब्बी ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले. फळबागांसह हळद पिकाचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या पावसाची नोंद मिमीमध्ये पुढीलप्रमाणे- िहगोली २४, कळमनुरी २०, सेनगाव ३२, वसमत १०.४३, औंढा २९.२५. जिल्ह्यात एकूण सरासरी २३.१४ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून तालुकास्तरावरील पथकाकडून पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीचा प्राथमिक अहवाल उद्यापर्यंत (मंगळवार) सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अवकाळीने लातूरला झोडपले; बळिराजाला पुन्हा मोठा फटका
रविवारी सायंकाळ ते सोमवारी सकाळपर्यंत जिल्हाभर झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. डािळब, द्राक्ष, आंबे, चिंच या पिकांना चांगलाच फटका बसला.
First published on: 03-03-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in latur