बीड व उस्मानाबाद जिल्ह्य़ांत सोमवारी दुपारनंतर अवकाळी गारपीट झाली. सोसाटय़ाच्या वाऱ्यात गारपीट एवढी की जणू बर्फवृष्टीच! बीडच्या परळी तालुक्यात शेतामध्ये सगळीकडे गारांचे थर साठले. एवढे की, हा मराठवाडा की काश्मीर, असा प्रश्न पडावा. दीड ते दोन फूट गारांचा खच पडल्याने या तालुक्यातील सर्वच पिके अक्षरश: वाया गेली. परिसरातील मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब पडले.
साडेचारच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने परळी परिसरातील पांगरी, नाथरा, कवठाळी, देशमुख टाकळी, लिंबूटाक, इंजेगाव, बेलंबा, टोकवाडी, डाबी यांसह अनेक गावांना जोरदार फटका दिला. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची कोटय़वधी रुपयांची साखर भिजली. २० मिनिटांच्या पावसात पडलेल्या गारांनी शेतामध्ये अर्धा फूट बर्फाचा थरच साठला होता. अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले. कोणत्या गावात किती नुकसान झाले, याची माहिती तहसील कार्यालयात गोळा केली जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातही अवकाळी पावसाने पुन्हा सर्वदूर हजेरी लावली. उस्मानाबाद शहरासह तालुक्यात गारांचा पाऊस झाल्याने काढणीस आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह द्राक्ष, केळी आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. गारांचा पाऊस झाल्याने फळबागांना, विशेषत: तुळजापूर तालुक्याला मोठा फटका बसला. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र, पंचनामे सुरू होत नाहीत, तोच पुन्हा अवकाळी पाऊस झाला. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, परंडा, भूम आदी तालुक्यांमध्ये गारांचा पाऊस झाल्याचे वृत्त आहे. तेर व परिसरात सुमारे ५ मिनिटे गारांचा पाऊस झाला. रब्बी ज्वारी, गहू, हरभरा ही मुख्य पिके काढणीस आली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पिके काढून शेतातच ठेवली आहेत. मात्र, अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष व केळीबागांचेही नुकसान झाले.

Story img Loader