औरंगाबाद मराठवाडय़ात सर्वत्र अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. दुष्काळामुळे आधीच उत्पादन घटलेले असताना ऐन काढणीत गहू आणि ज्वारी होती. शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी सायंकाळपासून वातावरण बदलत गेले. अचानक रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे औरंगाबाद शहरातील वीज गुल झाली. उशिरा रात्रीपर्यंत विद्युतपुरवठा सुरळीत झाला नाही. त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावर होण्याची शक्यता आहे. ढोरकीन येथील पाणीपुरवठा केंद्रावर सुमारे दीड तास वीज नव्हती. तर नक्षत्रवाडी येथे पाच तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठय़ावर परिणाम होईल. जिल्ह्य़ात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने ऐन उन्हाळ्यात तापमानात मोठी घसरण झाली आहे. स्वाईन फ्लूचा प्रसार अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. शहरातील घाटी रुग्णालयात रविवारी १० रुग्ण होते. त्यातील ५ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे, तर ५ रुग्ण संशयित आहेत. आंब्याला मोठय़ा प्रमाणात मोहोर लागला होता. अवकाळी पावसामुळे कैऱ्या गळून पडल्या आणि मोहोरही झडला.
हिंगोली- जिल्ह्यात शनिवारच्या रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दुपापर्यंत सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा व फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मुळावर अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी चांगलाच आíथक अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात पाउस कमी पडल्याने दुष्काळग्रस्तांना राज्य शासनाने मदतीचे पॅकेज जाहीर केले. ही तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या हातावर पडते न पडते तोच या आधी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. दुसऱ्यांदा पडलेल्या अवकाळी पावसाने त्यात भर टाकली. आता गहू, हरभरा, ज्वारी, काढणीला आली असता शनिवारी रात्री अवकाळी पाऊस सुरू झाला. तो रविवारच्या दुपापर्यंत सुरू होता. रब्बी पीक काही प्रमाणात हाती लागेल या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकावर पुन्हा शनिवारी सुरू झालेल्या पावसाने पाणी फेरले.
बीड- शनिवारी दुपारपासूनच वातवारणात बदल झाल्याने रात्री सर्वदूर अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने ज्वारी, द्राक्षे, गहू, आंबा या पिकांना फटका बसला. पावसाअभावी दुष्काळी परिस्थितीशी झगडणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामातील पिकांनाही अवकाळी पावसाने नुकसानीत आणल्याने चिंता वाढली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप कायम राहिल्याने स्वाईन फ्लूचा धोका वाढल्याचे सांगितले जात असल्याने अनेकांनी तोंडाला मास्क बांधून फिरणे पसंत केले आहे. बीड जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून वातावरणात बदल झाला. सायंकाळच्या सुमारास पावसाळी वातावरण निर्माण झाल्यानंतर सोसाटय़ाच्या गार वार वाहू लागला. रात्री उशिरा पावसाची रिपरिप सुरू झाली. जिल्ह्यात सर्वच भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला. अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतातील रब्बीच्या हंगामातील पिकांचे या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी खरिपाच्या हंगामाला पाऊस न पडल्याने शेतकरी दुष्काळाशी सामना करत असतानाच रब्बीच्या हंगामातील हातात येत असलेली पिकेही अवकाळी पावसाने नासवली. त्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे.
 परभणी- अवकाळी पावसाचा जिल्ह्याला चांगलाच तडाखा बसला आहे. शनिवारी रात्रीपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. काढणीला आलेल्या ज्वारीसह गहू आणि आंब्याला या पावसाचा फटका बसला आहे. शनिवारी अचानक सकाळपासून वातावरणात बदल झाला. संपूर्ण दिवसभर वातावरण ढगाळ राहिले. रात्री ७नंतर परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री १० वाजता जोराचा शिडकावा झाल्यानंतर पाऊस थांबला. आज सूर्यदर्शन झाले नाही.
उस्मानाबाद- शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण व रात्री अवकाळी पावसाने जिल्हाभरात हजेरी लावल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी हातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या ज्वारी, गहू व हरभरा पिकांना फटका बसला. मराठवाडय़ातील रब्बी ज्वारीचे कोठार असलेल्या परंडा तालुक्याला या पावसाने सर्वात मोठा फटका बसत आहे. तर दुसरीकडे स्वाइन फ्लू आजाराला सध्याचे ढगाळ वातावरण व हवेतील गारवा आमंत्रण देत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात घट होऊन सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवेत गारवा असल्याने हे वातावरण स्वाइन फ्लूची शक्यता वाढविणारे आहे.
तुळजापूर तालुक्यातील बालाघाटाच्या डोंगररांगात मोठय़ा प्रमाणात द्राक्ष बागायतदारांनी लाखो रुपये खर्च करून द्राक्ष बागा जगविल्या आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने द्राक्ष बागायतदारांचे उत्पन्नही सुरू झालेले आहे. त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसल्याने द्राक्षांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे द्राक्षाचे घड खाली पडून नुकसान झाले.
नांदेड- नांदेड जिल्ह्य़ात अवकाळी पाऊस झाला. हिमायतनगर तालुक्यात पावसाची सर्वाधिक नोंद झाली, तर लोहा आणि कंधार तालुक्यात नोंद घेण्याजोगा पाऊस पडला नाही. या पावसामुळे जनजीवन थंडावले. शनिवारी सकाळपासून, तर काही ठिकाणी दुपारपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. माहूर, किनवट, हिमायतनगर भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे सर्दी-पडशाचे रुग्ण वाढतील, असा अंदाज आहे.

Story img Loader