सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने एका दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी जिल्ह्यातील देवळा, बागलाणसह काही भागास पुन्हा झोडपून काढले. सातत्याने चाललेल्या पावसाने कशीबशी तगलेली पिकेही भुईसपाट होत असल्याने शेतकरी वर्ग पुरता धास्तावला आहे. मागील दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात गारपीट व अवकाळी पावसाचे तडाखे सहन करावे लागत आहे. नैसर्गिक संकटात हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतरही अवकाळी पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची शुक्रवारी केंद्रीय पथकाने पाहणी केली. या दिवशी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. शनिवारी सकाळपासून उन्हाची तीव्रता वाढल्याचे जाणवत होते. दुपारनंतर बागलाण तालुक्यातील काही भागात जोरदार पावसाने झोडपून काढले. सटाणा शहरात पावसाचे प्रमाण तुरळक होते. देवळा तालुक्यात चारच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. तालुक्यातील कनकापूर, खर्डे, भऊर, खामखेडा सावकी, विठेवाडी आणि परिसरात सुमारे तासभर अवकाळी पाऊस झाला. देवळा शहरातही त्याने हजेरी लावली. दहा दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीचे तडाखे सहन करणारा शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. हजारो हेक्टरवरील द्राक्षबागा, डाळिंब, गहू, हरभरा, कांदा, टोमॅटो अशी बहुतेक पिके आधीच भुईसपाट झाली आहेत. या संकटातून उरलीसुरलेली पिकेही नष्ट होत असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. ग्रामीण भागावर कोसळलेल्या या संकटाचा परिणाम व्यापारी पेठेवरही जाणवत आहे. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरीव मदत द्यावी, कर्ज माफी द्यावी, पीककर्जाचे पुनर्गठन करावे आदी मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in nashik