पावसाने गुरुवारी जिल्हाभर जोरदार हजेरी लावली. परभणी व जिंतूर शहरांत दोन वेळा मुसळधार पाऊस झाला. पेरणीयोग्य पावसामुळे जवळपास सर्वच भागांत शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. गुरुवारी पावसामुळे शेतकरी सुखावला. सर्वत्र पाणी पाणी झाले. गेल्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पालवल्या असून सगळीकडेच शिवारात पेरणी चालू असल्याचे चित्र आहे.
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसामुळे यंदा मृग नक्षत्रातच पेरण्या करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली. मागील काही वर्षांपासून मृग नक्षत्रात पाऊस पडत नव्हता. यंदा या नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्हाभरात कापसाची लागवड सुरूझाली. सोयाबीन पेरणीसाठी शेतकरी मोठय़ा पावसाची वाट पाहात होते. गुरुवारी पहाटे साडेचारपासून पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरूपातील पावसाचा जोर नंतर वाढत गेला. सकाळी साडेसातपर्यंत परभणी, जिंतूर परिसरात जोरदार पाऊस झाला. सेलू, पाथरी, गंगाखेड भागांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सकाळच्या पावसामुळे परभणी शहरातील नाले वाहात होते. शहराभोवतालच्या लहानमोठय़ा नाल्यांना पूर आला. िपगळगढ नाला, डिग्गी नाला भरून वाहात होते. दोन तास झालेल्या पावसामुळे शहराच्या मध्यवस्तीत गुडघाभर पाणी साचले. गांधी पार्क या सखल भागात साचलेल्या पाण्याने पादचारी, वाहनधारकांचे हाल झाले. बसस्थानक परिसरातील डिग्गी नाला भरून वाहू लागल्याने अण्णा भाऊ साठे पुतळय़ासमोरून पाणी स्टेशन रस्त्याकडे शिरले. त्यामुळे एकच धांदल उडाली.
जिंतूर तालुक्यातही पावसाचा जोर होता. जिंतूरच्या डोंगराळ भागात पावसाने दोन तास बरसात केली. सेलू, पाथरी, गंगाखेड परिसरात पावसाचा जोर कमी होता. दिवसभर सूर्यदर्शन घडले नाही. दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दीड तास धो धो पाऊस पडला. परभणी, जिंतूर वगळता इतर तालुक्यांत मात्र पाऊस नव्हता. पूर्णा, गंगाखेड भाग कोरडाच राहिला. सकाळी आठपर्यंत जिल्हाभरात ३.५६ मिमी पाऊस पडला. आतापर्यंत एकूण ६९.८ मिमी पावसाची नोंद झाली.
नांदेड जिल्ह्य़ात अजूनही २१९ टँकरने पाणीपुरवठा
वार्ताहर, नांदेड
वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्य़ात आजवर १२.६४ टक्के पाऊस पडला. अपवाद वगळता सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात नियमित पाऊस सुरू आहे. त्यामुळे पेरण्यांची धांदल सुरू असली, तरी टँकरद्वारे पाणीपुरवठा आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे. सध्या २१९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मनपाने पाणीकपात कमी केली असली, तरी ग्रामीण भागात सुरुवातीच्या पावसाने जलस्रोतांना दूषित पाणी येते. त्यामुळे आणखी काही दिवस टँकर सुरूच राहणार आहेत.
गतवर्षी सरासरीच्या अध्र्यापेक्षाही कमी (४५ टक्के) पाऊस झाला. तत्पूर्वी व नंतरही अवकाळी पाऊस, गारपिटीने तीन हंगाम हातचे गेले. या पाश्र्वभूमीवर या वर्षी शेतकऱ्यांना मोठय़ा आशा आहेत. पावसाळ्याची सुरुवात समाधानकारक झाली. मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाला. दोन दिवस उघाड होती. परंतु नंतर सुरू झालेला पाऊस गुरुवारपर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरू आहे. मंगळवारी सरासरीच्या तुलनेत ३८.३८, तर बुधवारी १०.४४ मिमी पाऊस झाला. गुरुवारी सकाळी दहगाव तालुक्यात ४५.८६ मिमी पावसाची नोंद झाली. कंधार तालुका कोरडाच राहिला. नांदेड तालुक्यात जेमतेम दीड मिमी, मुदखेड ३, अर्धापूर ५.३३, भोकर २६.५०, उमरी ४, लोहा १.१७, किनवट ४.२९, माहूर २३.२५, हिमायतनगर २२, देगलूर ९, बिलोली १०, धर्माबाद ३.६७, नायगाव ५.४ तर मुखेड २ मिमी नोंद झाली. या पावसाळ्यात आतापर्यंत १२०.७४ मिमी पाऊस झाला. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत याची टक्केवारी १२.६४ आहे.
पावसाळ्याची समाधानकारक सुरुवात झाल्याने शेतकरी आनंदित असून ग्रामीण भागात खरीप पेरण्यांची लगबग सुरू आहे. बी-बियाणे, खते या साठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. पीककर्जाची समस्या अजूनही सुटली नाही. जूनअखेर बहुतांश पेरण्या आटोपतील, तर काही भागातील पेरण्या पूर्ण होण्यास जुलैच्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागेल, असे दिसते.
टँकर अजून काही दिवस सुरू
जिल्ह्य़ात सध्या २१९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विष्णुपुरी प्रकल्पात नवीन पाण्याची आवक वाढल्याने नांदेड महापालिकेने पाणी कपात कमी केली. चार दिवसांऐवजी दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, परंतु ग्रामीण भागात सुरुवातीच्या पावसाने विहिरी, कूपनलिकेला येणारे पाणी दूषित असल्याने एवढय़ातच टँकर बंद करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी पाणीपुरवठय़ासंदर्भात आढावा बैठक घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा