सांगली : जोरदार वार्यासह गुरूवारी सायंकाळी सांगलीत रोहिणीच्या पावसाने धुमाकूळ घातला. पावसाने महापालिकेच्या नालेसफाई कामाचा पंचनामा करीत वाहन चालकांची तारांबळ उडवली. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे वीज वाहक तारा तुटल्या, खांब वाकले तर रस्त्यावर पाण्याची तलाव झाले. मात्र, जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज भागात हलका पाउस झाला. दिवसभराच्या उकाड्यानंतर झालेल्या पावसाने हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे.
गेल्या चार दिवसापासून पावसाचे वातावरण तयार होते, मात्र, पावसाची हजेरी खंडित स्वरूपात होत आहे. गुरूवारीही दिवसभर हवेतील तपमान ३९ अंशावर पोहचले असले तरी आकाशात दिवसभर ढगांचा राबता दिसत होता. सायंकाळी चार वाजलेनंतर जोरदार वारे आणि ढगांचा गडगडाट यासह दमदार पावसाने सांगली, विश्रामबाग, मिरज, कुपवाड परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. पंधरा मिनीटाच्या दमदार पर्जन्यवृष्टीनंतर रिमझिम पाउस अर्धा तास सुरू होता. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गणपती पेठ, कापड पेठ हरभट रोडवर पदपथ विक्रेत्यांची स्थिती गंभीर झाली होती.
अचानक आलेल्या पावसाने दुचाकीस्वारांची पावसाचा मारा चुकवण्यासाठी रस्त्यावरील इमारत, दुकाने, झाडे यांचा आडोसा घेतला होता. सांगली-मिरज रस्त्यावर लावण्यात आलेले डिजीटल फलक जोरदार वार्याने फाटले. तासगाव, विटा परिसरातही हलका पाउस झाला. मात्र वार्याचा जोर जास्त होता.