रविवारी दुपारपासून ढगाळ वातावरण असणाऱ्या महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात सायंकाळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे पर्यटकांची त्रेधातिरपीट झाली. वाई, भुईंज या परिसरातही जोरदार पाऊस झाला. वाई येथे विद्युतजनित्रावर वीज कोसळल्यामुळे वाई शहरासह, पाचगणी, महाबळेश्वर परिसरात वीजपुरवठा खंडीत झाला होता. सायंकाळी पाऊस झाल्यामुळे कुठे काही नुकसान झाले असल्याचे कळू शकले नाही.
नगर जिल्ह्य़ात  कमी-अधिक पाऊस
जिल्ह्य़ाच्या बहुतांशी भागात शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गेली काही दिवस कडक ऊन व उकाडय़ाने हैराण झालेल्या व दुष्काळात होरपळत असलेल्या नागरिकांच्या आशा पल्लवीत केल्या. नगर शहर व परिसरात शनिवारी रात्री सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला.   
शहरातील पहिल्याच पावसाने वीज पुरवठय़ाचा खेळखंडोबा केला. महावितरणने पावसाळ्यापुर्वीची देखभाल व दुरुस्तीची कामे न केल्याने काल रात्री बराच काळ शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता, आजही अनेकवेळा वीज पुरवठय़ात व्यत्यय येत होता.
शहर व परिसरात  पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाने काही काळ जोरही पकडला होता, रात्री उशिरापर्यंत रिमझिम स्वरुपाचा पाऊस सुरु होता. मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर पाणी तुंबले होते. रात्री हवेत गारवाही पसरला होता. परंतु वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरीकांना उकाडय़ाचा सामना करावा लागला. रात्री साडेआठच्या सुमारास गेलेली वीज मध्यरात्री दीडच्या सुमारास आली. रविवारी दुपारपर्यंत वारंवार वीज पुरवठा खंडीत होत होता.
रविवारी सकाळी नोंदवलेला, गेल्या २४ तासातील पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे (आकडे मिलीमीटरमध्ये)- नगर २.६७, श्रीगोंदे ५.१३, पारनेर ३.१७, कर्जत ६.१४, पाथर्डी १.९, शेवगाव ०.५३, नेवासे ०.३८, श्रीरामपूर ०.६४. एकुण १.३९ मि. मी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा