मध्यंतरी काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मराठवाडय़ात पाऊस पुन्हा परतला आहे. जालना, परभणीमधील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर अजून नाही. बीडमधील आष्टी व पाटोदा तालुक्यांमध्ये पावसाने हुलकावणी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला, पण त्यातही फारसा जोर नव्हता. मराठवाडय़ात वार्षकि सरासरीच्या तुलनेत २४.६२ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. या पावसाने मोठय़ा पावसाला सुरुवात झाल्याचे संकेत दिले असले, तरी आजही मराठवाडय़ातील धरणांमध्ये पिण्यासाठी लागणारा पाणीसाठा तयार झाला नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
मंगळवारी रात्री जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ओढे-नाले वाहू लागले. परतूरमध्ये ९९, तर मंठा तालुक्यात ८३.२५ मिमी पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातही जोरदार पाऊस बरसला. सोनपेठ ९२, सेलू ६०, पाथरी ६१, मानवत ६२ मिमी याप्रमाणे पाऊस झाला. औरंगाबाद शहर परिसरात बुधवारी दिवसभर हलक्या, मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. थोडय़ाशा पावासानेही शहरातील काही रस्त्यांवर पाणी तुंबते. कचरा रस्त्यावर येतो. बुधवारीही सखल भागात पाणी साचले होते.
लातूर जिल्ह्यातील देवणी व उदगीर तालुक्यात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव व धारूर तालुक्यातही पावसाचा जोर होता. मात्र, आष्टी व पाटोद्यात पाऊस झालाच नाही. उस्मानाबाद तालुक्यात सर्वदूर पडत असला, तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत त्याचा जोर फारसा नव्हता. जिल्हानिहाय एकूण पाऊस, त्याची वार्षकि सरासरीशी असणारी टक्केवारी पुढीलप्रमाणे – औरंगाबाद १६५.५३ (२४.७२), जालना १९३.६३ (२६.७६), परभणी १८५.४५ (५०.४९), हिंगोली २८८.६६ (२६.०६), नांदेड २३१.३२ (२९.२९), बीड १५८.४५ (२४.०७), लातूर १६३.०२ (३१.८६), उस्मानाबाद १२२.४३ (१४.२४).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा