गेल्या दीड महिन्यापासून पावसासाठी कासावीस झालेल्या जनतेला मंगळवारच्या रिमझिम रिमझिम पावसाने थोडासा सुखद दिलासा दिला असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व आशांवर पाणी फेरले आहे. जून पूर्ण आणि जुल अर्धा गेला तरी यवतमाळवर वरुणराजाची वक्रदृष्टी कायम असल्याने लोक आणि शेतकरी पाण्यासाठी अक्षरश कासावीस झाले आहेत. घराघरात पाण्यासाठी प्रार्थनांचा पाऊस पडत असल्याचे आणि ‘मेघा रे पाणी दे’ चा आर्त स्वर ऐकायला येत असतांना पावसाने हजेरी लावल्याने तापमानातही बदल होऊन कडाक्याचे उन्ह जाऊन गारवा आला आहे.
चार दिवसापूर्वी उमरखेड, महागाव, बाभूळगाव, कळंब, आर्णी या भागात जोरदार पाऊस झाला. मात्र, जिल्ह्य़ात यवमाळसह उर्वरित भागात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही पाण्याचा एक थेंबही अवतरला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांसह सारी जनता त्राही त्राही करत होती. जूनमध्ये १८ तारखेला ७६ मि.मी. पाऊस झाल्याने आणि त्यानंतर दोनदा नावापुरती पावसाने हजेरी लावल्याने हरखलेल्या शेतकऱ्यांनी दोन लाख हेक्टरवर कापसाची पेरणी केली. मात्र, पावसाने इतकी प्रदीर्घ सुटी घेतली की, दुबार आणि तिबार केलेल्या पेरण्या अक्षरश वाया गेल्या. जिल्ह्य़ात साडे नऊ लाख हेक्टरपकी पाच लाख हेक्टरवर कापूस पिकतो. सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या व शेतकरी आत्महत्यांसाठी जगभर (कु) प्रसिध्द झालेल्या यवतमाळ जिल्ह्य़ात यंदा शेतकऱ्यांच्या हातून कापसाचे नगदी पीक गेले आहे. आता कपाळाला हात लावून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर सोयाबीन, तसेच तीळ, सूर्यफूल, एरंडी, तूर  इत्यादी पिकांचा पर्याय उरला आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे न पेरण्याचा सल्ला पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या येथील संशोधन केंद्राचे तज्ज्ञ डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी आंतरपिके घेण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सुचवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकारने सोयाबीन बियाणे मोफत पुरवावे
कमालीच्या उशिराने आलेल्या पावसामुळे कापसाचे नगदी पीक हातून गेल्याने संकटात आलेल्या शेतकऱ्यांना सरकारने आता सोयाबीन बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. जवळच्या आंध्रप्रदेश सरकारने ५० टक्के कमी किमतीत सोयाबीन बियाणे तेथील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात ज्या शेतकऱ्यांनी दुबार -तबार पेरणी केली आणि चौथ्यांदाही पेरणीच्या तयारीने कपाशीचे बियाणे खरेदी करून ठेवले त्यांचे बियाणेही आता निरुपयोगी झाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain start in yavatmal but farmers are unable to take cotton crop