|| महेश जोशी
कोपरगाव : पावसाळा सुरू होताच नैसर्गिक बदल घडत असतात. निसर्गाने जणू हिरवाईचा शालू पांघरला आहे. विविध पशू-पक्षी आनंदाने स्वच्छंद विहार करत बागडत आहेत, असे हर्ष उल्हास व आकर्षित करणारी दृश्ये सर्वत्र दिसू लागली आहेत . कोपरगाव पासून येवला १८ किलोमीटर अंतरावर या तालुक्यातील ममदापुर परिसरात वरुण राजा चांगलाच बरसल्याने निसर्ग बहरला आहे. त्या परिसरात मोर आनंदाने नाचू-गाऊ, बागडू लागले आहेत. पावसाळ्यात आनंदाने पिसारा फुलवून नाचणारा मोर बघणे म्हणजे विलक्षण बाब असते. ‘मयूरवैभव’ टिकवण्यात ममदापूर गावाचा व गावकऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. ममदापूरचा परिसर पावसाळ्यात शांत . वातावरण व जैवविविधतेमुळे इथे पूर्वीपासूनच लांडोरींचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. राष्ट्रीय पक्षी असलेला हा मोर गावाचे वैभव आहे. तसेच मोर हे भगवान शंकराचे पुत्र कार्तिकेय स्वामी यांचे तसेच सरस्वती देवीचे वाहनही आहे, त्या मुळे गावातील कोणीही मोराची शिकार करत नाही.
मोराबरोबरच मोठ्या संख्येने लांडोरीही पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त एकत्र उडणारे मोर-लांडोर , नाचणारे मोर-लांडोर, पिसं स्वच्छ करणारे मोर, झाडाच्या शेंड्यावर बसलेले मोर, अन्नाच्या शोधात फिरणारे मोर, प्रणयक्रीडा करणारे मोर-लांडोर अशा मोरांच्या हालचाली ममदापूर परिसरात पाहण्यास मिळत आहे.
मोराची महती
रंगीत पिसारा व डौलदार मानेमुळे मोराने पैठणी या महावस्त्रावर मानाचे स्थान मिळवले आहे, तसेच भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटावर मोरपिसाचे अविरत स्थान आहे. मोर हा भारताच्या संस्कृतीचा हिस्सा आहे. तो भारताबरोबरच ब्रह्म देशाचाही राष्ट्रीय पक्षी आहे. भारत सरकारने २६ जानेवारी १९६३ मध्ये मोर पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले होते. मोर कुक्कुट वर्गीय असून बहू भक्षी प्राणी आहे. त्याचे खाद्य किडे, धान्य, फळे, उंदीर, सरडे असे आहे. मोर दहा ते तेवीस वर्षपर्यंत जगू शकतो. पुणे जिल्ह्यातही शिरूर येथे मोराची चिंचोली गावात मोरांच्या झुंडीच्या झुंडी पहायला मिळतात. सध्या मोर प्रजाती धोक्यात आली आहे. वाढते शहरीकरण व आधुनिकीकरणामुळे झाडांचा होणारा ऱ्हास, नष्ट होणारी जंगले यामुळे मोरांना जपणे गरजेचे आहे. मोराची लांबी साधारण १०० ते १२५ सेंटीमीटर पर्यंत असते तर त्याचा पिसारा १९५ ते २५५ सेंटीमीटर लांब असू शकतो.