मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोकणात अक्षरश: धूमशान मांडले असून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. एकटय़ा रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात तब्बल ५ इंच पावसाची नोंद झाली असून, पाऊस व दरडी कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णत: विस्कळीत आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वेगवेगळय़ा घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक जण बेपत्ता आहे.
रत्नागिरीसह जिल्ह्य़ात मंगळवारी दुपारपासून पावसाने जोर धरला. त्यातही संगमेश्वर आणि गुहागर तालुक्यात संततधार पावसाने धुमाकूळ घातला. या दोन्ही ठिकाणी २४ तासांत तब्बल सुमारे दहा इंच (२१३ मिमी) पाऊस कोसळला. संगमेश्वर-आरवली मार्गावर तुरळ आणि धामणी या गावांजवळ मुंबई-गोवा महामार्गावर पाणी आल्यामुळे संध्याकाळी सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली. त्याचप्रमाणे संगमेश्वर-चिपळूण स्थानकांदरम्यान आरवलीजवळ रेल्वेमार्गावर माती आणि पाणी वाहून आल्यामुळे रेल्वे वाहतूकही बंद पडली. रात्री उशिरा दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. संगमेश्वर तालुक्यात सुर्वेवाडी-कापे येथे श्व्ोता रवींद्र सुर्वे ही शाळकरी मुलगी सायंकाळी ओढय़ाच्या पुरामध्ये वाहून गेली, तर धामापूर येथील संतोष धोंडू कुळय़े या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रायगड जिल्ह्य़ात गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी ९१.१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज येथे वासंती वसंत सुपेकर (५५) या रस्ता ओलांडताना वाहून गेल्या. पोलादपूर तालुक्यात लहुळसे येथील आकाश रिगे या १३ वर्षांच्या मुलाचाही पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. रोहा तालुक्यातील कडसुरे येथे मनोज भोकटे या गोंदिया येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे.
अलिबाग-नागोठणे रस्त्यावरून जात असलेल्या पाण्याच्या प्रवाहात दोन जण वाहून गेले होते. त्यातील थापा नामक व्यक्तीला वाचवण्यात लोकांना यश आले आहे, तर भोकटे बेपत्ता आहेत.
राज्यभरातही जोर
पुणे : पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती असल्याने राज्याच्या बहुतांश भागात पाऊस सुरू असून, पुढील दोन दिवसही पाऊस राहण्याची चिन्हे आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला. मात्र, त्याने मराठवाडय़ात विशेष हजेरी लावली नव्हती. त्यानंतर आता मराठवाडय़ासह सर्व भागांत पावसाचा जोर आहे. त्यातही मंगळवार रात्रीपासून चांगल्या पावसानेही हजेरी लावली. तो बुधवारीही कायम होता.
सध्या हवेच्या कमी दाबाचे एक क्षेत्र मध्य प्रदेशवर आहे. त्याचबरोबर मान्सूनच्या काळातील कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेला सरकला आहे आणि अरबी समुद्रात किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पुढील दोन दिवस राज्यात पाऊस कायम राहील.
सरासरीच्या पलीकडे
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या चारही उपविभागांमध्ये सध्या पावसाने सरासरी ओलांडली आहे. विदर्भात १ जून ते ३ जुलै या काळातील सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला आहे.
मराठवाडय़ात या काळातील सरासरीच्या ५ टक्के जास्त, मध्य महाराष्ट्रात ३७ टक्के जास्त पाऊस झाला आहे, तर कोकणात सरासरीच्या तुलनेत ४९ टक्के जास्त म्हणजेच सुमारे दीडपट पाऊस पडला आहे.
कोकणात पावसाचे धुमशान!
मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोकणात अक्षरश: धूमशान मांडले असून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. एकटय़ा रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात तब्बल ५ इंच पावसाची नोंद झाली असून, पाऊस व दरडी कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णत: विस्कळीत आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वेगवेगळय़ा घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक जण बेपत्ता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-07-2013 at 01:09 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain storms in konkan two killed in ratnagiri three in raigad konkan