सुमारे ३५० वर्षांंपासूनची चंद्रभान महाराजांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळच्या घटमांडणीनुसार यंदा सत्तांत्तराचे स्पष्ट संकेत आहेत. यंदाचे पर्जन्यमान सर्वसाधारण असेल. मात्र, गारपीट शेतकऱ्याचा पाठलाग करीत राहील. पिकांच्या संदर्भात कापूस उत्तम राहणार असून, त्याला दरही चांगले मिळतील. गहू, हरभरा, तूर ही पिके अनिश्चित राहतील. विदर्भाचे सध्याचे रोखीचे पीक सोयाबीन हे सर्वसाधारण राहील.
अक्षय्यतृतीयेच्या शुभमुर्हूतावर भेंडवळची सुप्रसिध्द घटमांडणी करण्यात आली. शनिवारी सकाळी पुंजाजी महाराज वाघ यांनी घटांमध्ये झालेल्या बदलानुसार घटमांडणीचे निष्कर्ष जाहीर केले. घटमांडणीत १८ कडधान्ये, पानसुपारी, सांडई कुरडईंचा वापर करण्यात येतो. या वर्षीच्या निष्कर्षांनुसार घटमांडणीतील पानावरील सुपारी रात्रभरातून बाहेर पडल्यामुळे राज्यकर्त्यांंमध्ये बदल होणार आहे. म्हणजेच, सत्तांतराचे स्पष्ट संकेत या भाकिताने दिले आहेत. यावर्षी कापसाचे पीक चांगले येईल. गहू, हरभरा, तूर अनिश्चित असेल. या १८ कडधान्यात सोयाबीनचा समावेश नसतो. त्यामुळे तिळाच्या राशीवरून सोयाबीनचे भाकित वर्तविण्यात येते. सोयाबीनचे व तिळाचे पीकही सर्व साधारण राहील. पावसाच्या संदर्भात जून, जुलै महिन्यात लहरी व अनिश्चित पाऊस राहील. कमी पावसातच पेरण्या कराव्या लागतील. ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही चांगला पाऊस राहील. ऑगस्टमध्ये वादळ व पुराची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशाला यावर्षीही परकीय शक्ती व घुसखोरीचा धोका आहे. त्यामुळे संरक्षण दलावर ताण राहील.

Story img Loader