कराड : पश्चिम घाटक्षेत्रात पावसाचे पुनरागमन झाले आणि कोयना पाणलोटातील वार्षिक सरासरीच्या समीप रेंगाळलेल्या पावसाचे प्रमाण चालू हंगामाचा बराच कालावधी शिल्लक असताना, आज रविवारी वार्षिक सरासरी मागे टाकणारा ठरले. कोयना पाणलोटातील यंदाच्या हंगामातील आजवरचा पाऊस जवळपास २०० इंच असून, सलग दमदार पावसाने पर्जन्यनोंदीमुळे धरणसाठे हलते झाले आहेत. सर्वाधिक पाऊस असलेल्या पाथरपुंजने २५० इंच पावसाचा टप्पाही मागे टाकला असून इथे ६,३५९ मिलीमीटर पावसाची नोंद आहे.
पश्चिम घाटक्षेत्रात पुन्हा कोसळू लागलेल्या पावसाचा जोर कोयना पाणलोटात वाढू लागला आहे. गेल्या ३६ तासांत पाणलोटात एकूण सरासरीच्या पाच टक्क्यांहून अधिक पाऊस होताना या पावसाने पाच हजार मिलीमीटर ही वार्षिक सरासरी आज रविवारी दुपारी मागे टाकली. कोयना धरणक्षेत्रात रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी चार या आठ तासांत सरासरी ६५ मिलीमीटर. यंदाच्या हंगामात आजवर ५,०४२ मिलीमीटर (वार्षिक सरासरीच्या १००.८४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस नवजा येथे ६९ एकूण ५,४०८ मिलीमीटर. खालोखाल महाबळेश्वर येथे ५१ एकूण ५,१७१ तर, कोयनानगरला ४५ एकूण ४,५४५ मिलीमीटर पावसाची नोंद राहिली आहे. दरम्यान, कोयना धरणातील जलआवक सहापट वाढली आहे. तर, जलसाठा दीड अब्ज घनफुटाने (टीएमसी) वाढून ९३ अब्ज घनफूट (८८ टक्यांहून अधिक) झाला आहे.
हेही वाचा : सातारा: राष्ट्रवादीचे जयंत पाटील व भाजप नेते मदन भोसले यांची भेट
यंदा पावसाचे बरसणे वेळेत सुरू होऊन एकंदर पाऊसमान तुलनेत ज्यादाचे राहिले. त्यामुळे गतखेपेच्या पावसाची कसर भरून निघताना भूगर्भातील जलस्तर उंचावताना ओसंडणारे जलसाठे, खळखळत्या नद्या, वाहते जलप्रवाह आणि हिरवीगार शिवारं असे सुखद चित्र राहिले होते. दरम्यान, गेल्या १०-१२ दिवसांपूर्वी पूर, महापूर व अतिरिक्त पावसाने पिके वाया जाण्याची चिंता असताना, पावसाने उघडीप घेतली आणि शेकरी वर्ग तसेच सर्वसामान्यांमध्ये चैतन्याचे वातावरण राहिले. तद्नंतर खरिपाच्या उगवत्या कोमांना लख्ख अन् तप्त सूर्यप्रकाश मिळाल्याने खरीप हंगाम जोमात राहिला आहे. असे असताना, पावसाने पुनरागमन केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कोयना शिवसागरासह अन्य धरणसाठे पुन्हा वाढू लागले आहेत. खरिपाच्या जोमदार पिकांना हा पाऊस तारणार की मारणार हेही महत्त्वाचे असून, त्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहणार आहेत.