लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : प्रखर उन्हाळ्यात दुष्काळामुळे तहानलेल्या सोलापूर जिल्ह्यात रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्राचा दमदार पाऊस पडत असल्यामुळे वातावरण बदलले आहे. भीमा खोऱ्यातील पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील वरच्या भागातून उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग तीन दिवसांत सुमारे आठ हजार क्युसेकवरून निम्म्याने म्हणजे ४८६७ क्युसेकपर्यंत आला आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस होण्याची अपेक्षा आहे.

गतवर्षी पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे उजनी धरण ६०.६६ टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा झाला होता. मात्र दुष्काळात तेराव्या महिन्याप्रमाणे धरणातील पाणीवाटप नियोजन चुकल्यामुळे गेल्या हिवाळ्यामध्ये जानेवारीतच धरण वजा पातळीवर गेले होते. वजा पातळीतील पाणीसाठा झपाट्याने खालावून तो वजा ६० टक्क्यांपर्यंत गेला होता. परंतु गेल्या चार दिवसांपासून भीमा खोऱ्यात पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरणात दौंडमार्गे पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सुमारे आठ हजार क्युसेक विसर्गाने धरणात पाणी मिसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे. मात्र धरणात मिसळणारा पाण्याचा विसर्ग ४८६७ क्युसेकपर्यंत कमी झाल्यामुळे सोलापूरकरांमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा वजा ६० टक्क्यांवरून वजा ५५.८८ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच तीन दिवसांत धरणात जवळपास चार टक्के म्हणजे सुमारे दोन टीएमसी पाणी वाढले आहे. सध्या धरणात एकूण ३३.७२ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

आणखी वाचा-रामलिंग धबधबा सुरू! अनेक वर्षांनंतर मृगात पहिल्यांदाच ओसंडला धबधबा

मृग नक्षत्राचा पाऊस सुरूवातीपासून पडत असून त्याचा जोर प्रामुख्याने उजनी पाणलोट क्षेत्रापेक्षा उजनी लाभक्षेत्रात जास्त आहे. माढा (१६३.९), पंढरपूर (१७३.६), मोहोळ (२२८.९), दक्षिण सोलापूर (१०९) आदी भागात भीमा नदीकाठी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. त्यामुळे पंढरपूरसह अन्य भागात भीमा नदीत पाणी वाढले आहे.

गेल्याच महिन्यात सोलापूरसह पंढरपूर, मंगळवेढा, सागोला भागात तहान भागविण्यासाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. सुदैवाने यंदा पडणाऱ्या पावसामुळे भीमा नदीसह परिसरातील तलाव, बंधारे भरत आहेत. पंढरपुरातील दोन बंधारे ओसंडून वाहात आहेत. या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास यैत्या १७ जुलै रोजी होणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा पाणी सोडावे लागणार नाही, असे जलतज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे.