हवामानशास्त्र विभागातर्फे मान्सूनच्या पावसाचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर झाला असून, त्यानुसार शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस राहणार आहे. जुलैत सरासरीच्या १०१ टक्के, तर ऑगस्टमध्ये ९६ टक्केपाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण पावसाळय़ात (जून ते सप्टेंबर) प्राथमिक अंदाजप्रमाणेच ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाळय़ात ‘एल-निनो’चा अडथळा राहणार नाही.
हवामान विभागातर्फे २६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार या पावसाळ्यात देशात ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला. त्यानुसार देशभरात ९८ टक्के पावसाचाच अंदाज कायम ठेवण्यात आला. जुलै व ऑगस्टच्या पावसाचाही अंदाज देण्यात आला. जुलैत १०१, तर ऑगस्टमध्ये ९६ टक्केपावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यात ९ टक्क्य़ांचा फरक पडू शकतो. याचबरोबर देशाच्या विविध भागांत किती पाऊस पडेल हेही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्राचा समावेश असलेल्या मध्य भारतात ९८ टक्के, वायव्य भारतात ९४, दक्षिण भारतात १०३, तर ईशान्य भारतात ९८ टक्केपाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Story img Loader